
हिसवळ बु. (लक्ष्मण बोगीर) : नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथे ग्रामपंचायत जागेवरील कथित अतिक्रमण, बेकायदेशीर मुरुम वाहतूक आणि शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आरटीआय कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायतमध्ये २०१२ पासून संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले सोपान काशिनाथ शिरसाठ तसेच राजाराम किसन सोनवणे यांनी मिळून बेकायदेशीररित्या मुरुम वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. १ मे २०२६ रोजी ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने मुरुम वाहतूक करण्यात आली. त्याच दिवशी राजाराम सोनवणे यांच्या बांधकामाच्या चौथऱ्यावर मुरुम टाकून तो भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदाराने घटनास्थळी भेट देऊन छायाचित्रे घेतल्यामुळे त्या दिवशी सोपान शिरसाठ यांच्या चौथऱ्यावर मुरुम टाकण्यात आला नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दि. ६ मे २०२६ रोजी सोपान शिरसाठ यांच्या चौथऱ्यावर मुरुम भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अर्जदाराकडे ट्रॅक्टर, मुरुम वाहतूक, चौथरा भरण्याचे काम तसेच संबंधित वाहनांची छायाचित्रे व इतर पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीतील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे, सोपान शिरसाठ यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र संबंधित बांधकाम हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर नसून घर क्रमांक २३४ च्या पाठीमागील ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच घर क्रमांक २३४ ही जागा शिरसाठ यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीची असून ती त्यांच्या आई कुंदाबाई शिरसाठ यांच्या नावावर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित जागा आजही पडीत अवस्थेत असल्याचा दावा अर्जदाराने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामस्थांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर जागा उपलब्ध असताना ग्रामपंचायत जागेवर बांधकाम का करण्यात आले? ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीस घरकुलाचा लाभ मंजूर होऊ शकतो का? लाभ मंजुरीपूर्वी पात्रतेची पडताळणी करण्यात आली होती का? तसेच ग्रामपंचायत जागेवरील कथित अतिक्रमण असूनही स्थानिक प्रशासनाने कारवाई का केली नाही? असे सवाल उपस्थित होत आहेत.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी लेखी अर्ज, छायाचित्रे आणि माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, पंचायत समिती तसेच पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमण, घरकुल योजनेची पात्रता, बेकायदेशीर मुरुम वाहतूक आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
