
कु. भैरवी राजेंद्र कमानकर
सिन्नर (प्रतिनिधी)येथील मातोश्री चांडक कन्या विद्यालय विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल ९८.१५ टक्के लागून विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील अत्यंत हुशार, गुणवंत व हरहुन्नरी विद्यार्थिनी कु. भैरवी राजेंद्र कमानकर हिने ९८.८० टक्के गुण मिळवत संपूर्ण सिन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिला संस्कृत व गणित या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यालयातील कु. अक्षदा दीपक मुंढे हिने ९६.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, कु. स्नेहल बाळासाहेब कोटकर हिने ९४.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, कु. गौरी गणेश भट हिने ९४.४० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक तर कु. पूर्वा रवींद्र शिंदे हिने ९३.६० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.विद्यालयातून एकूण १६४ विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी १६० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून १३ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. तसेच ५५ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह, ५२ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत तर ४० विद्यार्थिनी द्वितीय व उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल कु. भैरवी कमानकर व सर्व यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, संस्थेचे कार्याध्यक्ष मारुतीराव कुलकर्णी, सेक्रेटरी राहुल मुळे, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, सर्व शाळा समिती सदस्य, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, सर्व पालक शिक्षक संघ सदस्य, मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
