
सिन्नर. (वसंत गोसाव, प्रतिनिधी): आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील ‘घरगणना’ मोहिमेसाठी सिन्नर तालुक्यातील ७०० पेक्षा अधिक प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे सखोल प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पार पडले. २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत चार टप्प्यांत चाललेले हे १२ दिवसांचे प्रशिक्षण अत्यंत नाविन्यपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाले असून, आता सर्व कर्मचारी प्रत्यक्ष कामासाठी सज्ज झाले आहेत. १६ मे ते १४ जून या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजेच घरगणना केली जाणार आहे. या अंतर्गत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला ३४ महत्त्वपूर्ण प्रश्न विचारणार आहेत आणि माहिती संकलित करणार आहेत. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यासाठी प्रामुख्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण मोहिमेचे आणि प्रशिक्षणाचे अचूक नियोजन सिन्नरचे तहसीलदार तथा जनगणनेचे ‘चार्ज अधिकारी’ सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कार्यभाराचे अतिशय सुयोग्य वाटप केले.खेळीमेळीच्या वातावरणात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण

जनगणनेसारखे क्लिष्ट आणि तांत्रिक काम समजून सांगण्यासाठी हे प्रशिक्षण केवळ व्याख्यानांपुरते मर्यादित राहिले नाही. फिल्ड ट्रेनर्सनी अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहवर्धक वातावरणात हे प्रशिक्षण दिले. यामध्ये विविध खेळ, सराव चाचण्या आणि प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन जाऊन प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनातील जनगणनेबाबतच्या शंका दूर होण्यास मोठी मदत झाली.या फिल्ड ट्रेनर्सची लाभली मोलाची साथ
सिन्नर तालुक्यात हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब तुकाराम सदगीर, भरत सोमनाथ बोडके, समाधान मोहन मते, दिपक बिभीषण वंजारे, गणेश अशोक वामन, विजय गुलाबराव कोळी, रमेश त्रंबक विघ्ने आणि कैलास गेणू शेळके या फिल्ड ट्रेनर्सनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व मनोगत:
सुरेंद्र देशमुख (मा.तहसीलदार सिन्नर तथा चार्ज अधिकारी): “जनगणना हा देशाच्या भविष्यातील विकासाचा पाया आहे. आमच्या सर्व अधिकारी व शिक्षकांनी हे प्रशिक्षण अत्यंत गांभीर्याने पूर्ण केले असून, सिन्नर तालुका १०० टक्के अचूक आणि निर्दोष जनगणनेसाठी आता पूर्णपणे सज्ज आहे.”
बाळासाहेब सदगीर (फिल्ड ट्रेनर): “राष्ट्रीय पातळीवरील हे महत्त्वपूर्ण काम अचूक व्हावे यासाठी आम्ही प्रत्यक्ष कृती आणि सरावावर भर दिला. सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी दाखवलेला उत्साह, सकारात्मक प्रतिसाद आणि शिकण्याची वृत्ती खरोखरच कौतुकास्पद होती.”
वसंत गोसावी, मुख्याध्यापक (प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक): “प्रशिक्षणात केवळ तात्विक माहिती न देता, प्रत्यक्ष फिल्डवरील सराव आणि खेळांच्या माध्यमातून दिलेल्या या प्रशिक्षणामुळे ३४ प्रश्नांची गुंतागुंत अतिशय सोपी झाली. आमच्या सर्व शंका दूर झाल्या असून कामाचा आत्मविश्वास वाढला आहे.”
