
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- मातापिता हे खऱ्या अर्थाने आपल्या हृदयमंदिरातील साक्षात परमेश्वरच असतात. जीवन संपन्न करणाऱ्या मातापित्यांच्या संस्कारांनीच आपल्या श्रीमंतीत अधिक भर पडते, असे उदगार संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी काढले. नाणेगाव येथील युवालेखक प्रवीण शंकरराव रोकडे पाटील यांच्या आरुष प्रकाशन प्रकाशित ‘काका’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना ते बोलत होते. इस्रोच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागप्रमुख वैज्ञानिक नम्रता बुटे, ज्येष्ठ अभिनेते संजय गंगावणे, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, काशीनाथ कर्डिले, युवाकवी शरद आडके, शंकरराव रोकडे, सुलोचना रोकडे, चैताली रोकडे, नितीन रोकडे, माधुरी रोकडे, लेखक प्रवीण रोकडे पाटील मंचावर उपस्थित होते. विवेक उगलमुगले पुढे म्हणाले की, प्रवीण रोकडे हे लेखनाचं अचूक भान असलेले नवे आणि कसदार लेखक आहेत. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक मोठा असून त्यांच्या अनुभवाचा पैस मोठा आहे. हे पुस्तक म्हणजे मातापित्यांना दिलेली अनोखी सलामी आहे, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ अभिनेते संजय गंगावणे यांनी आपल्या भाषणात लेखकाने आपल्या मातापित्यांचे ऋण फेडत त्यांच्या संस्कारांची पूजा केल्याचे मत मांडले तर नम्रता बुटे यांनी कुटुंबाचे आधारस्तंभ असलेल्या वडिलांचा हा सर्वोच्च सन्मान असल्याचे म्हटले. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी लेखकाचा गावाला अभिमान वाटत असल्याचे उदगार काढले. कवी शरद आडके यांनी आत्मचरित्राचे अंतरंग उलगडवून दाखवत सादर केलेल्या कवितेने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. लेखक प्रवीण रोकडे पाटील यांनी आपल्यासह परिवाराच्या यशस्वी वाटचालीत वडिलांचे कष्ट, शिस्त, त्याग, प्रेम आणि संस्कारांची शिदोरी यांचा मौलिक वाटा आहे. म्हणूनच या आत्मचरित्राचे खरे नायक वडील आहेत, असे सांगितले. लेखकाच्या भगिनी पुष्पा गवळी, योगेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पंचक्रोशीतील विविध संस्थांच्या पदाधिकारी आणि मान्यवरांसह लेखकाचा मित्रपरिवार सहकुटुंब उपस्थित होता. कवी रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले तर नितीन रोकडे पाटील यांनी आभार मानले.
