
प्रतिमा राजेश्वर पारखे, मानसशास्त्र विषयात राज्यात प्रथम
श्रीरामपूर प्रतिनिधी : श्रीरामपूर जि अहिल्यानगर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयचा विद्यार्थी प्रतिम राजेश्वर पारखे याने नुकत्याच झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेत इयत्ता बारावीच्या परीक्षेत मानसशास्त्र विषयात १०० पैकी १०० टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच सर्व विषयात ९४.१७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रतिम पारखे हा श्रीरामपूर जि अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संथेच्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयचा विद्यार्थी असून त्याने सन २०२५-२६ यावर्षासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत इयत्ता बारावीच्या परीक्षेत मानसशास्त्र या विषयात मराठी भाषेतून शिक्षण घेतले असून त्याने पेपर देतांना इंग्रजी भाषा निवडली होती, बोर्डाकडून त्याचा पेपर तीन तज्ज्ञ परीक्षकांकडून तपासणी केला असता त्याला तीनही परीक्षकांनी १०० पैकी १०० गुणावर शिक्कामोर्तब करून महाराष्ट्रात पहिला आल्याचे जाहीर केले असल्याचे त्याच्या शाळेचे प्राचार्य आणि विषय शिक्षक यांनी कळविले आहे. तसेच सर्व विषयात ९४.१७ टक्के गुण मिळवून त्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
त्याच्या यशामागे रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ बडदे सर, वर्ग शिक्षक प्रोफेसर बारस्कर सर, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर पटेल सर, आणि ज्या शिक्षकाच्या शिकवणीमुळे प्रतिमने राज्यात इतिहास घडविला ते मानसशास्त्र विषयाचे शिक्षक प्रोफेसर शिंदे सर यांचा मोलाचा वाटा होता. प्रतिमचे वडील गाड्यांच्या इंजिनमधील बॉशपंपाच्या दुरुस्तीचे काम करतात, हल्ली अत्याधुनिक यंत्रामुळे गाड्यांच्या इंजिनचे कामे निघत नाही त्यामुळे पारखे यांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते, अशा परिस्थितीत प्रतिमने परिस्थितीवर मात करून कोणतेही क्लास न लावता केवळ शिक्षकांच्या अध्यापनावर लक्ष देवून आणि घरी अभ्यास करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून आपल्या आईवडिलांसोबतच शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यात प्रतिमने फ्रेंच भाषेतून शिक्षण घेऊन त्यात निष्णात पंडीत होण्याचा मानस केला आहे. त्याच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या सन्माननीय सौ.मीनाताई जगधने मॅडम यांनी विशेष सत्कारीत केले आहे तसेच स्थानिक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद , कार्यालयीन कर्मचारी, विध्यार्थी मित्र आणि आप्तेष्ट यांनी घरी येवून त्याचा यथोचित सन्मान केला आहे.
