
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक। गुरु ओम्। गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन। अभंग क्रमांक-२६
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
एक तत्व “नाम” मनात दृढ निश्चयाने पक्के धर। म्हणजे, हरीला तुझी करुणा येईल। नाम व नामी यांच्यात कसलाही भेद नाही। दोन्ही अभेद आहेत। ईश्वरनामात ईश्वर पूर्ण असतो। सद्गुरुंपासून जो मंत्र मिळतो त्यात सद्गुरु व ईश्वर प्रत्यक्ष असतात। तुका म्हणे देवा। पावे अंतरीची सेवा॥१॥ हरीची कृपा जरी समान आहे, तरी सर्वांना त्याचा अनुभव येत नाही। कारण सर्वांची परमेश्वरावर दृढ श्रध्दा नसते। ज्याचा नामस्मरणावर विश्वास आहे, ईश्वरावर विश्वास आहे, त्यालाच ईश्वराचा अनुभव येतो। दृढ विश्वास ठेऊन ईश्वर नामस्मरण केले तर परमेश्वराला आपली करुणा येते व त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो,
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं- कोणते नाम जपायचे? ते नाम अगदी सोपे आहे, “राम-कृष्ण-गोविंद” अगोदर वाणीने सद्गदीत होऊन जप कर। ज्या वस्तु बद्दल अत्यंत प्रेम असते त्याबद्दल बोलतांना वाणी आपोआपच सद्गदीत होते, कंठ दाटून येतो। अंतरंगात अष्ट सात्विकभाव उत्पन्न होतात। “आपादकंचुकित रोमांच आले।ज्ञानेश्वरी॥”
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासील झणीं- नामापेक्षा श्रेष्ठ तत्व दुसरे नाही। त्यामुळे इतर मार्गांकडे जाऊच नको। कारण ईतर मार्ग कठीण आहेत, नामजप, भक्तीमार्ग सोपा आहे।
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां- अंतरी जपमाळ ठेव, व मौन धर। व सदैव श्रीहरीचा जप कर। वाचिक वैखरी वाणीने जप करण्यापेक्षाही मानसिक जपाचे जास्त वैशिष्ट्य आहे। वाचिक (वैखरी वाणी) जपापेक्षा उपांशु जप, न बोलता फक्त ओठ हलविणे, हा हजार पटीने श्रेष्ठ आहे, व उपांशु जपापेक्षा मानस जप सहस्र पटीने श्रेष्ठ आहे।
सामान्यपणे हातात माळ ठेऊन जप करण्याची पध्दत आहे, परंतु, हातात जपमाळ न घेता, मानसिक जप करणे हे त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। मानसपूजा। मनाने पूजा। शिवमानसपूजा प्रसिध्द आहे। “करावे ते पूजा मनेचि उत्तम। लौकीकाचे काम नाही येथे॥तुकाराम महाराज॥ मी खूप मोठा भक्त आहे हे इतरांना दाखविण्याची गरज नाही, त्यामुळे अभिमान वाढतो। देवाला अभिमान आवडत नाही। त्यामुळे मनानेच, मनोभावे प्रेमाने ईश्वराची भक्ती करावी। “तुका म्हणे देवा। पावे अंतरीची सेवा॥१॥”
[19-01-2023]
