
बीड (विष्णु गायकवाड,. जिल्हा प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज गुरुवारी (दि.9) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला असून घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे स्वतः कार चालवत प्रवास करत होते. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली आणि अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेवेळी ते कारमध्ये एकटेच होते. अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. एक कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राकेश गिड्डे यांच्या आकस्मिक निधनामुळे महसूल विभागासह केज तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
