
गडचिरोली ( प्रतिनिधी )- संभाजीनगर येथे दि. ३ मार्चला झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार व साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.तिफण त्रैमासिक व तिफण वाचक चळवळ, कन्नड जि. संभाजीनगर यांचे वतीने दरवर्षी साहित्यिकांकरीता तिफण राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते. व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी तीनशे साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.

त्यात मराठी नाट्यवाड्.मय प्रकारात नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा महात्मा फुले उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.संभाजीनगर येथील महात्मा गांधी स्मारक निधी भवनात झालेल्या तिफण पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, (ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ), डॉ. ललिता गादगे (ज्येष्ठ लेखिका) यांचे हस्ते प्राचार्य डॉ. विजय भोसले(शिवाजी महाविद्यालय कन्नड), डॉ. सर्जेराव जिगे (मराठी अभ्यास मंडळ, औरंगाबाद), प्रा. डॉ. रमेश जाधव (मराठी विभाग प्रमुख , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद), डॉ. मच्छिंद्र गोर्डे (कार्याध्यक्ष, महात्मा गांधी स्मारक निधी भवन), प्रा. डॉ. शिवाजी हुसे (संपादक तिफण), प्रा. डॉ. दिलीप बिरुटे (अध्यक्ष, तिफण वाचक चळवळ), प्रा. डॉ. रामचंद्र झाडे, डॉ. नवनाथ गोरे (सदस्य, संपादक मंडळ) इ. मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चुडाराम बल्हारपुरे यांना या वर्षी मराठवाड्यात मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे तर राज्यस्तरावर मिळालेला हा सातवा पुरस्कार आहे.चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल झाडीपट्टीत सर्वत्र कौतुक होत असून प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, रमेश निखारे, प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, डॉ. दिपक चौधरी, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
