

लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक
॥आत्मा मालिक॥गुरु ओम्। गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन। अभंग-२५-
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥
भगवंत शब्दाची व्युत्पत्ती-“ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिय:। ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा॥ ७४॥ विष्णु पुराण-६-५॥ परिपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री म्ह संपत्ती, ज्ञान व वैराग्य या सहांना “भग” अशी संज्ञा आहे। हे सहाही गुण ज्याचे जवळ परिपूर्णत्वाने वसतात, तो भगवान होय। आईका यश श्री औदार्य। ज्ञान वैराग्य ऐश्वर्य। हे साही गुणवर्य। वसती जेथ॥झानेश्वरी-६-३७॥ ज्ञान आणि वैराग्य पुर्ण। लक्ष्मी आणि औदार्य गुण। ऐश्वर्य आणि यश गहन। हे षट्गुण जाण महाभाग्य॥नाथ भागवत॥१९-४९६॥ परमेश्वरावाचून कोणात ही हे सहा गुण एकत्र राहू शकत नाहीत। आढळून येत नाहीत.
षड्गुणैश्वर्य संपन्न। एक भगवंतचि जाण॥तुका॥ म्हणून त्याला भगवंत म्हणतात।
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां- नामस्मरण करणारा भक्त जाणता-जाणीव असलेला, ज्ञानी, आहे की नेणीव-अजाणता, अज्ञानी आहे असा विचार भगवान् ईश्वर करीत नाही। नाम जपतो त्याचा ऊध्दार परमेश्वर करतो। याच अर्थाने अमृतानुभव या ग्रंथात सद्गुरुंचे स्वरुप सांगणारी एक ओवी आहे,
“कैवल्य कनकाचिया दाना। जो न कडसी थोर साना। द्रष्ट्याचिया दर्शना पाढाउ जो॥२-५॥ मोक्षरुपी सुवर्णाचे दान करतांना सद्गुरु समोरची व्यक्ती लहान आहे की मोठी आहे याचा विचार न करता, असा भेदभाव न करता सर्वांना सारखाच मोक्ष देतात। सर्वांना समान कृपा देतात।“
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं- याचा विचार आपण यापूर्वी अनेकदा केला आहे। भक्ति किंवा ध्यान करतांना ध्यानाच्या उच्च अवस्थेत आपण अशा जागी जाऊन पोहोचतो कि त्या ठिकाणी मृत्यु ला प्रवेश नाही, काळाचा रीघ नाही, काळ सुध्दा थांबून जातो। अखंड आनंदाचा तो प्रांत आहे।
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे त्या ईश्वराच्या स्वरुपाला वेद सुध्दा पूर्णपणे जाणू शकत नाही, तर सामान्य जीवजंतूंना म्हणजे सामान्य अल्पबुध्दी च्या माणसांना ते काय कळेल? सत्य युगात ध्यान केल्याने, त्रेता युगात यज्ञ केल्याने द्वापार युगात पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते ते कलियुगात फक्त नामस्मरणानेच प्राप्त होते।
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्हाला हरीनामाचा पाठ हेच फळ (साध्य) आहे। भक्ती ही कर्म, ज्ञान, योगा यापेक्षाही श्रेष्ठ आहे। भक्ती हि स्वयं फलरुप आहे। या नामस्मरणाच्या प्रभावाने हरिभक्तांनी सर्वत्र वैकुंठ केले आहे।
