
✍️ शब्दांकन प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे नाशि
. – II● शिवाजंली ●II-
दि. ३ एप्रिल १६८०, शनिवारचा दिवस, महाराज निघाले! चालले! सह्याद्रीचे महाराज निघाले! स्वराज्यांतील मुलाबाळांचे, भावाभावजयांचे, पशुपक्षांचे, सर्वांचे महाराज निघाले! पन्नास वर्षे सर्वांना लळा लावून, वेड लावून महाराज निघाले! रायगड दु:खाने काळवंडला. अवघ्या पन्नासाव्या वर्षी आमचे महाराज चालले?
गडावर रामचंद्रपंत अमात्य, गंगाधरपंत हणमंते, रावजी सोमनाथ, बाळप्रभू चिटणिस, हिरोजी फर्जंद, बाबाजी घाटगे, बाजी कदम, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबळ वगैरे कितीतरी सवंगडी चिंतेने अन दु:खाने व्याकुळ झाले होते. महाराजांनी आपल्या, नव्हे स्वराज्याच्या सर्व नातलगांना जवळ बोलाविले. सर्वजण आले. कोणाच्याहि मुखातून शब्द फुटेना. महाराज मात्र शांत होते. ते आता सर्वांचा अखेरचा निरोप घेत होते. महाराज सर्वांना म्हणाले “आपली आयुष्याची अवधि झाली! आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार!”
दु:खाचा एकदम टवका उडाला. सर्वांच्या डोळ्यांतून ढसढसा अश्रु वाहूं लागले. सर्वांच्या ह्रुदयांत आकांत उडाला. तोंडातुन शब्द उमटेना. केवढी धुरंदर माणसे ही ! पण दु:खाश्रुंचा लोंढा फुटला त्यांच्या काळजातून. स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता महाराजांसाठी आपले प्राण देखील देणारी ही वेडी माणसे. हिरोजी फर्जंद महाराजांना म्हणाले असतील कां हो? हो नक्कीच म्हणाले असतील की ” महाराज आग्र्याला तुमच्या शय्येवर मी झोपलो होतो. तुम्हाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी. महाराज आताही तुमच्या या मृत्युशैय्येवर मी झोपतो. तुम्ही या मृत्युच्या कैदेतून सुखरुप बाहेर पडा !!!”
महाराज अत्यंत शांतपणाने त्यांना म्हणाले “तुम्ही चुकार होऊं नका. हा तो म्रुत्युलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरुप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो” केवढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारुन्, अवघी सुखदु:खे पूर्ण विसरुन महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले! महाराजांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. सर्वजण बाहेर आले.
दुपारचे सुमारे बारा वाजले होते. आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले! आजवर जिंकलेले राज्य,किल्ले,हत्ती,घोडे,धनदौलत सोडून देऊन, आजवर जोडलेले आप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळविलेली सर्व यशकिर्ति तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरूदावली जशीच्या तशीच सोडून देऊन, कशाकडेहि मागे वळून न पहातां महाराज मृत्यूचे बोट धरून शांतपणे निघून गेले! आणि शिवभारत संपले.
ऐसे राजे होणे नाही.
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला ।
कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला ।
शिवकल्याणराजा ॥
● शिवछत्रपतींच्या पवित्र स्मृतीस मानाचा त्रिवार मुजरा. 🙏🏻🙏🏻
