
नाशिक ( प्रतिनिधी )– आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे राबविण्यात आलेला “सायन्स ऑन व्हील्स” हा प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरला आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील तब्बल १०० शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष व अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले. या माध्यमातून सुमारे ५० हजार लोकांपर्यंत विज्ञानाची माहिती पोहोचवण्यात आली.

या प्रकल्पासाठी इस्पेलियर हेरीटेज स्कूल चे संस्थापक अध्यक्ष सचिन उषा विलास जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले, त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी सुसज्ज बस तयार केली असून, या बसमध्ये सूर्यमाला, अवकाश विज्ञान, तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचा इतिहास याबाबत आकर्षक व समजण्यास सोपी माहिती मांडण्यात आली आहे. रॉकेट निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात सायकल आणि बैलगाडीचा वापर कसा करण्यात आला, यासारखी प्रेरणादायी उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली, ज्यामुळे त्यांच्यात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले.
प्रकल्पादरम्यान विविध विज्ञान प्रयोग, मॉडेल्स आणि संवादात्मक सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली. विशेष म्हणजे, या उपक्रमात दिव्यांग (विकलांग) विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून आला.
शिक्षक, पालक व स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “सायन्स ऑन व्हील्स” हा प्रकल्प भविष्यात अधिकाधिक दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस असून, विज्ञान शिक्षण अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
