
नांदगाव:-( प्रतिनिधी)-मविप्र संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयाच्या परिसरातील हनुमान मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ठीक ६ वाजता पवनपुत्र हनुमानाला विधिवत अभिषेक घालण्यात आला. मंत्रोच्चारांच्या जयघोषाने आणि ‘बजरंग बली की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिषेकानंतर मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक जगन्नाथ पाटील व सौ.पाटील यांच्या हस्ते पूजेचा विधी पूर्ण झाला.
याप्रसंगी मविप्र संस्थेचे संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय काकळीज, जेष्ठ सभासद रमेश अण्णा बोरसे, रामनाथ गायकवाड,सुनील बोरसे, प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, प्राचार्य नरेंद्र पाटील, शरद थेट,गोरख वैद्य, ज्योती काळे, पूनम मढे,दिपक चव्हाण, शाम पवार,अविनाश शेवाळे उपस्थित होते.
दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात झाली. विद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजनामुळे सर्वांना सुलभतेने दर्शन आणि प्रसाद घेता आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यालयाच्या वतीने दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांची जोपासना होते, असे तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
