
‘मायमाती’शी घट्ट नातं जपणारा संवेदनशील कवी : विलास पगार
२ एप्रिल २०१९...ह्या दिवशी सायंकाळी प्रिय मित्र विलास निंबाजी पगार हा अनंताच्या प्रवासाला निघून गेला... तेव्हा त्याचे वय होते फक्त ४८. या वयात निघून जाणे हे किती दुर्दैवी. मराठी साहित्यातलं एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व लयाला पावलं.
‘माती माझी माय होते/दुधावरची साय होते
हंबरणाऱ्या वासरांसाठी/पान्हावलेली गाय होते…’
इतकं हृदयस्पर्शी लिहिणारा आणि आयुष्यभर मायमातीशी असलेलं घट्ट नातं जपणारा हा सच्चा रानकवी. मातीचं नातं सांगताना-
‘माझं आणि मातीचं/असं एक नातं आहे
आयुष्य फिरविणारं/माती हेच जातं आहे…’
असं जेव्हा लिहून जातो; तेव्हा तो केवळ माझाच नाही तर जगन्मित्र होऊन जातो. सहज-सहज लिहिलेली परंतु आशयात कुठेही कमी न पडणारी त्याची प्रत्येक कविता रसिकांच्या काळजात घर करणारी.
त्याच्या कवितांइतकंच त्याचं-
‘काळीज दिलंय पोरी तुला गं आंदण
सासरी पाड ना जमेल तेवढं चांदणं…’
अशा अनेक कवितांचं सादरीकरण अत्युत्तम असायचं. चौफेर वाचनानं त्याचं अभ्यासपूर्ण आणि खुमासदार सूत्रसंचालन कार्यक्रमात बहार आणायचं. त्याचे मिश्कील आणि प्रासंगिक विनोद हसता हसता लोटपोट करायचे. उत्तम पाठांतराची अमोघ देणगी लाभलेल्या विलासबरोबर अनुभवलेलं प्रत्येक कविसंमेलन, प्रत्येक प्रवास हा निश्चितच आनंददायी आणि अविस्मरणीय झालेला. आज सारं-सारं डोळ्यासमोरून तरळून जातंय. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो बातमीदार होता. सामाजिक आणि सांस्कृतिक बातमी कशी लिहावी, याचा आदर्श वस्तुपाठ होता विलास.
खुंटेवाडी (ता.देवळा) येथे आस्वाद साहित्य मंडळ स्थापन करून ग्रामीण साहित्य संमेलन यशस्वी करणारा, चांदोबा-मायमाती-परिचय पुस्तकांचा अशी तीन रसिकमान्य पुस्तकं लिहूनही कुठलाही गर्व न बाळगणारा, मायमाती काव्यसंग्रहाला राज्यभरातील सर्व मानाचे पुरस्कार मिळाल्यावरही जमिनीशी घट्ट नातं जपणारा, वर्षभरातून दोन-तीन वेळा विजयावहिनी, आकाश आणि निखिल यांना आवडेल तेथे प्रवास घडविणारा कुटुंबवत्सल प्रमुख, नाशिकच्या पखाल रोडवरील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थिप्रिय शिक्षक, अनेक संस्थांशी निगडित असणारा, अनेक नवागतांना लिहितं करणारा, प्रसिद्धीच्या झोतात असतानाही ‘अरे ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून फार मोठं व्हायचंय…’ असं मला सहजपणे म्हणणारा विलास…सगळं सगळं आज आठवतंय आणि आठवतच राहतं. आम्हा मित्रांनाच त्याच्या इतक्या आठवणी येत असतील; तर त्याच्या कुटुंबाला किती त्रास होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
‘जन्म देणाऱ्या आणि मेल्यानंतर स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या माय आणि मातीस…’ अशी अर्पणपत्रिका त्याने ‘मायमाती’ या संग्रहाला लिहिलेली आहे. याच संग्रहातील ‘मायबाप’ या कवितेतील त्याच्याच ओळींनी नाशिककर कवी-रसिकांच्या वतीने कवी विलास पगार यांना श्रद्धांजली अर्पण करताना इतकंच म्हणतो की-
‘तुम्ही झालात आभाळ/दिली आम्हाला सावली
तुमच्या मायेची नदी/नाही कधीच आटली…’
-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर, नाशिकरोड.
मो.९४२३०९०५२६.
