
त्यानिमित्ताने सोमवंशी सरांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं काकांचं शब्दचित्र…!
बापच माझा माझा विठ्ठल….
आज दादांचे ८५ वर्ष पूर्ण…
८६ वा वाढदिवस…..
संपूर्ण आयुष्यात जे काही कष्ट वाट्याला आले त्यात समाधान मानून पूढे जाणाऱ्या पैकी एक म्हणजे आमचे दादा…..
मु.पो.सुंदरपूर तालुका निफाड जिल्हा नाशिक हे आमचे मूळ गाव… परंतू सुंदरपूर येथील जुन्या गावठ्या वरील घर जळाले राहण्याची परवड झाली, तोकडी शेती व उदरनिर्वाहाचा प्रश्न यासाठी आजोबांनी साधारण १०० वर्षांपूर्वी निफाड गाठलं….
म्हशी व गायी दुहायच्या म्हणजे तिचे दूध काढून द्यायचे व १५ रूपये महिना मिळायचा….त्यामुळे हा व्यवसाय पत्करला आणि निफाडकरांसाठी आजोबा सर्वांचे परबती मामा झाले…..
दादांचे कष्टाळू आई-वडील ते परबती मामा ( पर्वतराव या नावाचा अपभ्रंश) म्हणून निफाड मध्ये ओळखले जात… आजोबा आणि आजीने प्रचंड कष्ट केले….त्यातूनही निफाड इंग्लिश स्कूल, निफाड मध्ये शिक्षण घेऊन दादा जुनी मॅट्रिक झाले त्यानंतर शेतातली काम गवत वाहणे खोडकं काढणं ,,सोंगणी करणं , लासलगाव वरून पायी खाटकाचे बकरं आणयचे अशी कामं त्यांनी केली.
त्यानंतर उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी स्व.कचूनाना जेऊघाले यांच्या अशोक ब्रास बँड मध्ये ड्रम प्लेयर म्हणूनही काम केले संपूर्ण आयुष्य कष्टात घालवत असताना एम्प्लॉयमेंट मध्ये अर्ज केलेल्या नावनोंदणी च्या माध्यमातून त्यांना इंडिया सेक्युरिटी प्रेस (ISP) नाशिकरोड या ठिकाणाचा नोकरीचा कॉल आला …
स्व.बळवंत चुंबळे मामांनी बाळनाथ लवकर निघून ये नोकरीवर रुजू हो…..अशा प्रकारचे सूचना नाशिक रोड वरून निरोप पाठविला व सूचना केली , दादा त्यावेळेस मळ्यामध्ये गहू सोंगत होते तसेच आवरून ते नाशिकला रोडला स्व.बळवंत चुंबळे मामाकडे घरी थांबले दुसऱ्या दिवशी मामांसोबत जाऊन नोकरीवर इंडिया सिक्युरिटी प्रेस आय.एस.पी रुजू झाले तो दिवस होता १२ फेब्रुवारी १९६६ …..
प्रेस ही संकल्पना त्या काळामध्ये विविध व्यसनांच्या अधीन असलेल्या व्यक्तींबाबत बोलले जायचे परंतु दादांनी कधीही कोणतीही व्यसन केल्याचे आजही आम्हाला आठवत नाही अत्यंत गरिबी असतानाही त्यांनी केवळ कुटुंब आणि आपली शेती यांच्यामध्ये पैसा गुंतवत गेले परंतु शेतीतल्या नुकसानीमुळे त्यांना कधीही शेतीतून भरघोस उत्पन्न घेता आले नाही मात्र तरीही त्यांनी कधीही कुरकुर केली नाही आपल्या मुलाबाळांना आपण पुरेसे देऊ शकलो नाही याची खंत दादांना वेळोवेळी होत राहिली आम्हीही ते कधीही जाणवू दिले नाही.त्यावेळेस ती जबाबदारी पार पाडली आमच्या आत्या श्रीमती सुमन पर्वतराव सोमवंशी यांनी… माझ्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली व माझी रवानगी इयत्ता दुसरी पासून आत्यांकडे वैतरणानगर तालुका इगतपूरी या ठिकाणी झाली.आजोबा व मी आत्यांकडे राहू लागलो.
दादा नाशिक रोडला राहायचे आणि आठ दिवसांनी घरी यायचे कारण त्याकाळी गाड्यांची व ट्रान्सपोर्टेशनची एवढी सोय नसल्यामुळे दररोज येजा करणे शक्य नव्हतं तेवढा खर्चही परवडणारा नव्हता आणि म्हणून सुरूवातीला ते भाडेकरू म्हणून व नंतर स्वतः प्रेस ची क्वार्टर घेऊन तिथेच हाताने स्वयंपाक करून राहायचे.ताई मळ्यात शेतीची कामे करून इतर भावंडांना सांभाळणे व त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायची….
महिन्याकाठी दादांचा आमच्यासाठी असलेला खाऊ ठरलेला होता तो म्हणजे म्हैसूर पाक… आणि भेळभत्ता….
मला फक्त सुट्यांमध्ये त्याचा आनंद घेता आला…..तेवढा खाऊ म्हणजे आमच्यासाठी पुरेसा असायचा आम्ही सगळी बहिण भावंडे आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचो आणि पुन्हा महिना संपण्याची वाट बघत दादांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो असायचो….
२९ वर्ष वर्कर म्हणून रुजू झालेल्या दादांना नंतर प्रमोशन मिळाले….. नंतरच्या काळात त्यांच्या जोडीला स्व.यशवंतराव कुंदे काका, स्व.भास्करराव शेळके काका, श्री.मधुकर कोष्टी काका अशी अनेक मित्र मंडळी पहाटे ४ वा. निफाड वरून पॅसेंजर पकडायला कुंदेवाडीपर्यंत पायी चालत जायचे व यायचे .कधी पायी कधी जगनकाका चा टांगा असा प्रवास करत संपूर्ण आयुष्यभर प्रेसची प्रामाणिकपणे नोकरी करत राहिले आणि त्या नोकरीतही अनेक वेळा आजारपणाने त्यांना गाठलं तरीही इमानेइतबारे आपल्या कुटुंबासाठी काम करण्याचे ध्येय त्यांनी सोडलं नाही. शांत , संयमी काहिसे कमी बोलणे या स्वभावामुळे त्यांना कुणाशी भांडलेले पाहिले नाही….
आपली नोकरी भली अन् आपण भले असे प्रत्येक प्रेस कामगाराचा जीवनक्रम असतो तोच त्यांनाही वाट्याला आला.
त्यानंतर साडेचार वर्षं चेकर व दिड वर्ष सिनीयर चेकर म्हणून पासपोर्ट विभागातून २००१ साली ३५ वर्षांची सेवा करून सेवानिवृत्त झाले…
ताई ची साथ आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी त्यांना आयुष्यभरासाठी कामी आल्या …. चि.सौ.का.मृणाल च्या विवाह सोहळ्यापूर्वी ३ नोव्हेंबरला दादा खूपच आजारी पडले…अनेक दिवस आय सी यू मध्ये व नंतरच्या काळात बेडवर त्यांनी अनेक दिवस काढले….तरी नातीच्या लग्नाची तयारी कशी चाललीय यांची काळजी ते करत होते… आपल्या मुळे सगळे अडकून गेले आहेत याची खंत त्यांनी ताईजवळ व आत्यांजवळ बोलून दाखवली…..
१७ नोव्हेंबरला नातीच्या लग्नाला हजेरी लावली.
आमच्या सर्व कुटुंबाने परमेश्वराला केलेली प्रार्थना व सेवा यामुळे आज ते अत्यंत स्वस्थ आहेत….आनंदी आहेत…
पूर्वी पत्नीला तिच्या नावाने हाक मारत नसे म्हणून……मी भाग्यवान असा की संपूर्ण आयुष्यभर दादांनी ताईला ” राजू ” या माझ्या नावानेच बोलावलं….आजही त्याच नावाने त्यांची हाक ऐकून ताई धावत येते.
दादांना जुनी गाणी आणि जुन्या लावण्या खूप आवडतात…..आम्ही कसे त्रिताल व झपताल वाजवायचो असे आजही ते समजावून सांगतात….
खरंतर ” बाप ” समजून घेणं तसंही अवघड असतं…दादांच आयुष्य फारच निर्मळ आणि नितळ आहे..
काही दिवसांपूर्वी दादा अशक्तपणा असल्याने पडले त्यामुळे त्यांना फ्रँक्चर झालं… ऑपरेशन केलंय आता तब्येत ठीक आहे….! लवकरच बरं वाटावं यासाठी प्रार्थना….!
जसे आहे तसेच ते आहेत अशा दादांना ……
ते असणे दिवाळी-दसरा
सण नसतो कुठला दुसरा,
धन असते दुसरे काय
एक बाप आणि ती माय ….
ती आशीर्वाद सावली,
नित्येच रहावी डोई ,
एवढे मागणे देवा
मज नको आणखी काही…!
दादा…. तुमच्या आरोग्यासाठी व उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….!
तुमच्या आवडीचं नाव …
भाऊ…..
