
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र कै. रोडूआण्णा पाटील यांच्या ८४ व्या जयंतीदिनी गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे विश्वस्त भिलाजी दुकळे व मान्यवरांच्या हस्ते रोडूआण्णांच्या समाधीचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त लक्ष्मण दुकळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत सर्व संचालक, विश्वस्त, सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे, दगडू पटांग्रे, विलास अहिरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ माजी प्राचार्य पी. एन. पवार, माजी शिक्षक, प्राचार्य पी. जी. माने, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित.

प्रसंगी वर्षभरातील विविध स्पर्धा, उपक्रम, कार्यक्रम, क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना तसेच दहावी, बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी रोशन हिरामण दुकळे यांची धर्मादाय आयुक्तालयात वरिष्ठ सहाय्यक म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव महेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एस. एस. सी. परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वाधिक ९२ गुण मिळवणारी संस्कृती दुकळे हिला इंग्रजीचे शिक्षक आर. जे. जाधव यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य माने यांनी केले, त्यांना पंचक्रोशीतील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविणेकामी रोडूआण्णांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी तरुणाईसाठी निर्माण केलेल्या व्यवसायाच्या नवनवीन संधी व साधने परिसराचा केलेला विकास आदी कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ए. एम. साळुंके यांनी आपल्या मनोगतातून रोडूआण्णांच्या जीवन कार्याचा परामर्श घेतला. सूत्रसंचलन प्रा. डी. एस. जमधाडे व प्रा. पी. यु. शिंदे यांनी केले तर आभार पी.एम. थोरे यांनी मानलेत.
