नाशिक( प्रतिनिधी) :- समाजातील चालीरीती, रूढी, परंपरा लेखकाचे नेहमीचे विषय असतात. मात्र यापलीकडे कथाबीज म्हणून ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवून भावभावना आणि निरीक्षण क्षमतेतून जेव्हा अनुभूतियुक्त कथा लिहिली जाते, तेव्हा ती अस्सल ग्रामीण समाजव्यवस्थेचे चिंतन वाटते. युवा कथालेखक उद्देश शेवाळे यांच्या ‘एकायतन’ या कथा संग्रहातून अशाच कथा वाचकांसमोर येतात, असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी चे पहिले मानकरी ऐश्वर्य पाटेकर यांनी केले.
उद्देश शेवाळे लिखित आणि अक्षरबंध प्रकाशन प्रकाशित ‘एकायतन’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आजीचं पुस्तकांचं हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे होत्या. ज्येष्ठ कथालेखक सप्तर्षी माळी, प्रकाशक प्रवीण जोंधळे, उद्देश शेवाळे, मनीषा शेवाळे, रेखा शेवाळे आणि प्रीती जोंधळे मंचावर उपस्थित होते.
पाटेकर पुढे म्हणाले की, कथासंग्रहातील प्रत्येक कथा एका नव्या व्यक्तीला वाचकांच्या समोर आणते. त्यामुळे वाचनीय असलेल्या कथा प्रेरक झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.
प्रमुख अतिथी सप्तर्षी माळी यांनी एकायतन कथासंग्रहाचा गोषवारा घेत, उद्देश शेवाळे यांचा पहिलाच कथासंग्रह असल्याने त्यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. लेखक शेवाळे यांनी बालपणी लागलेल्या वाचनाच्या आवडीमुळे लेखनास प्रारंभ झाल्याचे सांगून आपली आजपर्यंतची वाटचाल कथन केली. रसिकांसह कथालेखक उद्देश शेवाळे यांचे आप्तेष्ट आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान, ग्रंथपूजन आणि वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रकाशक प्रवीण जोंधळे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले तर आभार गीतांशी शेवाळे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कवी राजेंद्र सोमवंशी, अथर्व जोंधळे, प्रीती जोंधळे, अवनी जोंधळे, परीक्षित शेवाळे, रेखा शेवाळे, मनीषा शेवाळे यांनी परिश्रम घेतले.