
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग २३
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्व मार्गा वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥
शास्रात अनेकांनी अनेक तत्त्वांचा उल्लेख केला आहे। सांख्य-२५ तत्व, या सांख्यांच्या २५ तत्वांचा सविस्तर विचार याच ग्रुपवर आपण यापूर्वी केला आहे। काहीनी ३६ तत्वे, १६, १३, ९, ११, १७ ३६ तत्वांचा विचार सांगीतला आहे। त्यात पुरुष, प्रकृति, ११ इंद्रिये पंचमहाभूते इत्यादिंचा विचार आहे। अशी अनेक भिन्न भिन्न मते आहेत, निवृत्तिनाथांनी एका ठिकाणी म्हटले आहे, “एक तत्व हरि असे पै सर्वत्र। ऐसे सर्व शास्र बोलियेले॥१॥”
तैसें नव्हे नाम सर्व मार्गा वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती- एक तीन पाच मेळा पंचविसांचा। छत्तीस तत्वाचा मूळ हरि॥१॥नाथ भा॥ तुका म्हणे एक विठ्ठलचि खरा। येर तो पसारा वाऊगाचि॥१॥ तुका॥ या तत्वांचा विचार नीट समजून घेतल्यास मोक्ष प्राप्त होतो, असे त्यांचे मत आहे। एका हरीत सर्व तत्वे आहेत। परंतु हा अनेक तत्वांचा विचार खूप गहन आहे। सामान्य माणसाला ते समजणे कठीण आहे। त्यापेक्षा नामसंकीर्तन हे सोपे साधन आहे, यात काही कष्ट लागत नाहीत।
अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे- अजपाजप म्हणजे काही जप न करता आपोआप होणारा सहज जप। फक्त आपल्या श्वासावर लक्ष, अनुसंधान ठेवायचे। हा जप प्रत्येकात अखंडपणे चालू असतो। मनुष्य रोज २१६०० वेळा श्वास घेतो। काही जप न करता श्वासावर अनुसंधान म्हणजे अजपाजप।
श्वास बाहेर जातांना “ह असा आवाज ऐकू येतो, श्वास आत घेतांना “स” असा आवाज ऐकू येतो। (१)-हकारेण बहिर्याति सकारेण विशेत्पुन:। हंस हंसेत्यमुं मंत्र: जीवो जपति सर्वदा॥ योगचूडामणि उपनिषद्॥३१॥ (२)- “सकारेण बहिर्याति हकारेण विशेत्पुन:। हंस हंसेत्यमुं मन्त्रं जीवो जपति नित्यश:॥१५५॥विज्ञान भैरव॥ (३)-षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकविंशति:। एतत्सङ्ख्यान्वितं मन्त्रं जीवो जपति सर्वदा॥३२॥ यो. चू. उ.॥
हंस: हंस: असा जप होत असतांनाच गुरुवाक्याने सुषुम्ना मार्गाने अभ्यास करीत असता तो उलट होत होत “सोऽहं” होतो। शंकर पार्वतीस सांगतात, (४)-गुरुवाक्यात्सुषुम्नायां विपरीतो भवेज्जप:। सोऽहं सोऽहमितिप्राप्तो मंत्रयोग: स उच्यते॥१॥ योगबीज॥ तो परमात्मा मी आहे, आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य या मंत्रात प्रतीतीस येते। “स” कार हे शक्तिबीज असून “ह”कार हे पुरुषबीज आहे। या सहज जपाकडे अनुसंधान वृत्ती सतत स्थिर असली पाहिजे। या सतत अभ्यासाने श्वासाची गती शनै: शनै: कमी होत गेल्याचे अनुभवास येते। स्वाभाविकपणे श्वास नाकाच्या बाहेर बारा अंगुळे वहात असतो। देहाद्बहिर्गतो वायु: स्वभावाद्द्वाद्शांगुलि:॥ घेरंड संहिता-५-८६॥ नासापुटौ नि वारा। जो जातसे अंगुळे बारा॥ ज्ञानेश्वरी-६॥ सतत अनुसंधानपूर्वक जप होत जाईल तस तसा मनोलय होऊन प्राणाचा ही लय होईल। वरील अजपाजपाने हे प्रमाण कमी कमी होत जाऊन शेवटी श्वासाचा पूर्ण निरोध होतो। म्हणजे केवल कुंभक साध्य होतो। वायुना घटसंबंधे भवेत्केवल कुंभकम्॥घेरंड सं-५-८९॥ असा हा केवल कुंभक साध्य झाला असता शरीरात प्राणाचा उलट म्हणजे प्राण हा ऊर्ध्वमुख होऊन कुंडलिनीस जागृत करतो। कुंडलिनी जागृत झाल्यावर ती षट्चक्र शोधन करुन ब्रम्हरंध्रापावेतो जाते। मूळ वायूच्या प्राण व मन या २ वृत्ती आहेत, यापैकी कोणास एकास जिंकले असता दोहोंचा ही निरोध होऊन आत्मदर्शन होते। अजपाजपाने प्रथम मनोलयपूर्वक प्राण निरोध होत असतो। सतत “सोऽहं” “सोऽहं” जप करता करता सकार व हकार या उपाधी नष्ट होतात, व त्या उपाधींच्या मध्य संधीतील “ॐकार” च अनुभवास येतो। अनाहत ध्वनी उत्पन्न होऊ लागतो। नादानुसंधान। [ह आणि स हे शिव-शक्ती चे २ चरण आहेत]
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला- ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कितीही साधने केली, व नामस्मरण केले नाही तर ते जिणे व्यर्थ आहे। ईश्वरनामानेच जीवनाची सार्थकता होते। कलियुगात हरिनाम जपणे हाच ईश्वरप्राप्तीचा सोपा व एकमेव उपाय आहे। त्यामुळे सर्व सांगोपांग विचार करुन रामकृष्ण नामस्मरणाचाच मार्ग अनुसरला आहे। [16-01-2023]
