
ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
नाशिक (प्रतिनिधी):-दोन वेगवेगळ्या धाटणीची पुस्तकं म्हणजे ढिकले यांच्या चिंतनशीलतेचा आणि प्रतिभेचा प्रत्यय देणारी दोन टोकं आहेत. त्यात शेतीमाती आणि नात्यांबरोबरच आधुनिक पुरोगामी विचारदेखील आहेत. अत्यंत विपरीत परिस्थितीतून पुढे येत श्री.ढिकले यांनी आपले समृद्ध जीवन आणि समाजातील कटू अनुभवांवर या पुस्तकांत भाष्य केलेले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माजी आ.नानासाहेब बोरस्ते यांनी केले

ज्येष्ठ साहित्यिक तु. सी. ढिकले यांच्या ‘…राहिले ते तीर्थ’ या आत्मबंधात्मक ललित लेखसंग्रह आणि ‘भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे’ या विडंबन गीतसंग्रहाचे प्रकाशन येथील मु.शं.औरंगाबादकर सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विनोदी साहित्यिक नरेश महाजन अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ कवी विवेक उगलमुगले, विडंबनकार संजय आहेर, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोतदार यांच्यासह लेखक श्री.ढिकले आणि अलका ढिकले मंचावर उपस्थित होते.
श्री.बोरस्ते म्हणाले की, लेखक ढिकले आणि माझ्या जडणघडण आणि संस्कारांमध्ये बरेचसे साम्य आहे. त्यातूनच आमची मैत्री आहे. ढिकले-बोरस्ते युतीचा इतिहास नाशिकला माहीत आहेच, अशा मार्मिक शब्दांत त्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात श्री.महाजन यांनीही विडंबन काव्यप्रकाराबद्दल यथोचित विवेचन केले. ढिकले यांनी विडंबनाला अत्यंत गांभीर्याने घेतले आहे, असेही ते म्हणाले.
लेखक ढिकले आपल्या मनोगतात म्हणाले की, माझ्या सर्वच लेखनाचा पाया म्हणजे संत तुकारामाचा अभंग आहे. ‘…राहिले ते तीर्थ’मध्ये याच भावनेतून भूतकाळातील आठवणींना वर्तमानात चिटकवून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. श्री.आहेर, श्री. उगलमुगले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.वसंत ढिकले आणि इंजि.बाळासाहेब मगर यांनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले.
अविनाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राजेश पढेर, प्राचार्य राजेश्वर शेळके, विडंबनकार संजय आहेर, अरुण इंगळे यांनी विडंबनगीतं सादर केली. लेखक ढिकले व सौ.ढिकले यांचा विजय पाटील आणि सावळीराम तिदमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. रसिक श्रोत्यांमधून नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर आणि ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.प्रसाद ढिकले यांनी आभार मानले.
