
भोंदूगिरी, बुवाबाजी विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी यासाठी मा.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा . जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या मार्फत निवेदन देताना नाशिक येथील महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते.
भोंदू अशोक खरात उर्फ कॅप्टन , गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा या भोंदूंसह नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रभरातील देव,धर्म, अध्यात्माच्या नावाखाली आणि अंधश्रद्धा युक्त दैवी तोडगे, उपाय करून तसेच फलज्योतिष सांगून सर्वसामान्यांचे विविध प्रकारे प्रचंड शोषण करणाऱ्या भोंदूंना कायमस्वरूपी चाप बसावा म्हणून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची धडक मोहीम राबवावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंनिसचे नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नाशिक जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना सादर केले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
सध्या नाशिक येथील भोंदू खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. त्यामुळे भाविकांची, लोकांची खऱ्या अध्यात्मावरील श्रद्धा आणि विश्वास डळमळीत होत आहे.
राजकारण्यांनी भोंदूगिरीला खतपाणी घालू नये. जेही कोणी राजकारणी ,उद्योजक, सेलिब्रिटी भोंदू खरातशी संबंधित असतील
त्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच, भोंदू गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा आणि इतर भोंदूचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, म्हणजे लपून-छपून चाललेल्या भोंदूगिरीलाही मोठ्या प्रमाणात आळा आणि चाप बसू शकेल.
तसेच सर्व पीडितांचे सर्व प्रकारचे पुनर्वसन शासनाच्या वतीने करण्यात यावे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात अध्यात्माच्या नावाखाली भोंदूगिरी फोफावण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून आतापासूनच त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती, लोकप्रबोधन होईल असे उपक्रम, कार्यक्रम आणि भोंदूगिरीला धाक पोहचेल अशा प्रकारच्या कायदेशीर उपाय योजनांचे नियोजन करून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल , असे पाहावे अशी विनंतीही निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री,कोमल वर्दे, विजय बागुल, राजेंद्र फेगडे, विजय खंडेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
