
सिन्नर (प्रतिनिधी): शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे खऱ्या समाजसेवेचे लक्षण आहे. हाच वसा जपत, मा. श्री. जयंतभाऊ दत्तात्रय गाडेकर ( प्रख्यात कामगार नेते) आणि त्यांचे सुपुत्र मा. श्री. सनीभाऊ जयंतभाऊ गाडेकर यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित, “महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलातील” प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या ६० गरजू विद्यार्थ्यांना शालेय बुटांचे (शूज) मोफत वाटप करण्यात आले.
संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. नामदेव लोणारे यांच्या हस्ते सत्कार
या कार्यक्रमाप्रसंगी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. नामदेव लोणारे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी गाडेकर परिवाराच्या दातृत्वाचे कौतुक केले.
"सामाजिक बांधिलकी जपून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावणे, हे अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावते,"
असे मनोगत श्री. नामदेव लोणारे यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य
शालेय जीवनात शिस्त आणि गणवेशाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हीच गरज ओळखून गाडेकर परिवाराने मदतीचा हात पुढे केला. दर्जेदार शालेय बूट मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रा.सौ.शितल मुदबखे यांचे विशेष प्रयत्न
या उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. शितल मुदबखे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून, दात्यांशी समन्वय साधून हा मदतीचा ओघ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे शिक्षणाधिकारी मा.श्री.राहुल वरंदळ, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोकुळ महाले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता राजगुरू संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.
