नाशिक ( प्रतिनिधी):- आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरे येत असतात. अशावेळी मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी कविता भक्कम साथरूपी आधार देतात. जीवनात कवितेचे शब्दच प्रभावी ठरतात, असे प्रतिपादन कवयित्री स्नेहल येवला यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २४३वे पुष्प गुफंताना 'स्नेहगंधाली' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होत्या. अध्यक्षस्थानी उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर गिरी होते.
स्नेहल येवला पुढे म्हणाल्या की, शब्द प्रत्येक वेळी साथ देतीलच; हे निश्चित नसते. कारण आभाळ भरून आले तेव्हा त्याला आभाळ म्हणतो आणि निरभ्र मोकळे असते तेव्हा त्याला आकाश म्हणतो. बाई मनातल्या मनात व्यक्त होत असते. मानवी भावनांशी एकरूप झालेल्या कविता मैत्रीण बनतात. तेव्हा कविता लिहायला बळ येते. स्वत:ला स्वतः अजमावून बघण्याचे सामर्थ्य कवितांमधून निर्माण होते, असेही त्या म्हणाल्या.
सुहास टिपरे आणि अजित कुलकर्णी यांना ग्रंथभेट देण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (३१) माधुरी पाटील 'त्यागमूर्ती कुमुदिनी' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.