
नांदगाव:— मविप्र संस्थेचे
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक रंगमंच दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती आणि नाट्यकलेचे आराध्य दैवत असलेल्या नटराजाच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, “नाट्यकला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती समाजाचा आरसा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन रंगभूमीशी नाते जोडले पाहिजे.” त्यांनी जागतिक रंगमंच दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व यावरही प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अभिनय आणि सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. रंगमंच माणसाला जगायला शिकवतो आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ही कला अत्यंत प्रभावी आहे.”
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
