
शनिवार, २८ मार्चला २०२६ रोजी सायंकाळी ६. ०० वाजता नाशिकच्या सार्वजनिक वाचनाल्याच्या औरंगाबादकर सभागृहात आजी, माजी आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत व दिग्गज जेष्ठ साहित्यिकांच्या शुभहस्ते होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात “भाजके फुटाणे अन खारे शेंगदाणे” या विडंबनपर काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या कवी, गझलकार, विडंबनकार तु. सी. ढिकले सर यांच्या पुस्तकासंबंधी थोडेसे परिचयात्मक लिखाण!
तु.सी.ढिकले यांनी आतापर्यंत नऊ साहित्यकृती प्रसवल्या आहेत. त्यांचे हे नवे अपत्य फारच “खोडकर” निघाले. विडंबनात्मक लेखन संग्रहाबद्दल त्यांनी आपली प्रथमत: भूमिका मांडलेली आहे.” विडंबन म्हणजे निव्वळ आनंद! कवितेच्या सीमित चौकटीत त्याच लय- तालात बसणाऱ्या नवा वेगळा आशय सांगणारा शब्दांचा मुक्त संवाद!” पुढे ते असं म्हणतात, रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया विडंबन कलेत असते. यासाठी अनेक विडंबनकारांचे दाखले देखील त्यांनी दिलेले आहेत. पुढे जाऊन ते ठामपणे असे सांगतात की, मूळ कवितेवर किंवा कृतीवर कलम केल्याशिवाय त्यात जिवंतपणा येत नसतो. मात्र हे करताना मूळ कविता आणि नवीन विषयाचा समन्वय साधताना बुद्धीनिष्ठ चोखंदळपणाचा खरा कस लागत असतो. तो प्रत्येक वेळेला मनासारखा साधेलच असे नाही! अशी प्रामाणिक भूमिकाही ते मांडतात. ते त्यांनी रसिकांवर सोपवले आहे.
या ५७ कवितांचे… ज्या वाचकाच्या मनात रुजलेल्या आहेत, घोळलेल्या आहेत, मनात बसलेल्या आहेत, अशाच परिचय असलेल्या गीत, गाणे, कविता यांच्यावर त्यांनी विडंबनात्मक रचना केलेली आहे!
म्हणून त्यांचे विडंबन काव्य अपरिचित वाटत नाही! सुरुवातीला मुखपृष्ठावर भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे हे सुंदर चित्र दाखवलेले आहे. हे पाहिल्यानंतर तोंडाला पाणी येते असं म्हणावसं वाटतं. म्हणून वाचकाला आतील विडंबन रचना वाचण्याचा मोह आपोआपच होतो.
पुरोगामी विचार करणारे व विडंबन रचनेतून पोहून आलेले संजय आहेर यांनी मलपृष्ठावर छान भलावन केलेली आहे. “सैराट” चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर आधारित कवी ढिकले सरांनी केलेले विडंबन काव्य वानगी दाखल इथं देत आहे…
नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यासाठी उमेदवारांची कशी नुसती टिप्परघाई होती!
त्यावर ते लिहितात….
आता उतावीळ झालो
गुडघा बाशिंग बांधलं..
तिकिटासाठी धावून
पक्ष सारं म्या पूजलं!
लहान मुलांच्या ही तोंडी असलेली गीत, गाणे व कविता मी पुढे देत आहे. स्थळ काल अभावी मोजकेच देत आहे. बाकी पुस्तक वाचून रसिकाला नक्कीच आनंद मिळेल, एवढं मात्र खरं!
“मला बाई जायचं नांदायला”, “दिवस तुझे फुलायचे”, “आज गोकुळात रंग खेळतो हरी”, “गावाकडे चल माझ्या दोस्ता”, .”कसं काय पाटील बर हाय का, “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” , “चांदोबा चांदोबा भागलास का”, “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती”, “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का”, पाऊली चालली पंढरीची वाट”, “वेडात मराठे वीर दौडले सात”, “तुझा गळा माझा गळा”, “देहाची तिजोरी”, “सत्वर पाव ग मला” , “शूर आम्ही सरदार आम्हाला”, “जे का रंजले गांजले”, ” पाऊले चालली पंढरीची वाट”, “देवा तुझे किती सुंदर आकाश”, “खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे चिंधड्या”, “भातुकलीच्या खेळामधली”, “झाल्या तिनी सांजा”, व्योह व्योह पाहुणा सखूचा मेव्हणा, “सत्वर पाव ग मला”, “आई थोर तुझे उपकार”, “अरे संसार संसार”, “सलाम””, मांडवाच्या दारी सईबाई ग सई बाई”, एक तुतारी द्या मजा आणून”, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे”, ” आता तरी देवा मला पावशील का”, “तू माझा लेकुरवाळा””जपून चाल पोरी जपून चाल”, .. अशा बहुमुखी असलेल्या रचनांवर त्यांनी विडंबन केले आहे. बाकी आपण पुस्तक वाचून आस्वाद घ्यावा. विलास पोतदार यांनी मुद्रणाचा व पुस्तकाचा दर्जा आपल्या प्रतिष्ठेला साजेल असा राखला आहे.
पुस्तकाचे नाव – “भाजके फुटाणे
. अन्
खारे शेंगदाणे”
विडंबनकार – तु.सी. ढिकले
प्रकाशक – वैशाली प्रकाशन, पुणे
पुस्तक परिचय – योगाचार्य अशोक पाटील
