
भारतीय राज्यघटनेतील २५ ते २८ व्या कलमां दरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाला श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती आणि विचारांचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. तसेच नागरिकांना पारलौकिक कल्याणाच्या कल्पनांनुसार धर्मपालन करण्याचे स्वातंत्र्यही राज्य घटनेत अबाधित ठेवण्यात आले आहे.
मात्र हे स्वातंत्र्य उपभोगताना सार्वजनिक नीतिमत्ता, सार्वजनिक आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था यांना बाधा पोहोचणार नाही, याची जबाबदारीही घटनेने उपभोग घेणाऱ्यांवर टाकलेली आहे.

मागील काही वर्षांत धार्मिक सण , उत्सव, समारंभ या निमित्ताने घडणाऱ्या अथवा घडवून आणल्या जाणाऱ्या घटनांचे चिकित्सकपणे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की देव, धर्म आणि अध्यात्म यांच्या नावाखाली होणारे विधी, कर्मकांड, उत्सव आणि समारंभ यांना एक प्रकारचे प्रचंड उधाण आलेले आहे. परिणामी सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता आणि कायदा-सुव्यवस्था यांचा अनेकदा बोजवारा उडताना दिसतो.
मतांच्या राजकीय स्वार्थापोटी अनेक राजकीय पक्ष, व्यक्ती तसेच धार्मिक कट्टरता जोपासणाऱ्या जवळपास सर्वच धर्मांच्या संघटना, संस्था या अनिष्ट व बेकायदेशीर प्रकारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खतपाणी घालताना दिसतात.
या सर्व घडामोडींमध्ये अनेकदा प्रचलित कायद्यांचे सर्रास उल्लंघन होते. नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणाही अनेक वेळा अशा वेळी हतबल होताना दिसतात.
अशा प्रसंगांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा धार्मिक आणि जातीय द्वेष वाढवला जातो. सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होते किंवा केली जाते आणि त्यातून जीवघेणे प्रसंगही घडतात. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडते. असुरक्षितता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होते आणि ते बरेच दिवस तसेच राहाते.
या सर्व अनिष्ट, द्वेषमूलक प्रवृत्तींचा सर्वाधिक फटका,झळ सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक , शैक्षणिक संस्था,महिला आणि लहान मुलेमुली यांनाच अधिक बसतो. कारण देव-धर्म-अध्यात्म यांच्या नावाखाली पारंपरिकतेतून आलेले विचार आणि आचार त्यांच्याच माथी अधिक मारले जातात.
धार्मिक रंग असलेल्या सण-समारंभांमध्ये अनेकदा पोलीस यंत्रणाही कारवाई करण्यास धजावत नाही. तेथेही अनेक वेळा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. कायदेशीर कारवाई झालीच, तर ती अत्यंत थातूरमातूर स्वरूपाची असते. काही दिवसांत लोकांना विसर पडतो आणि पुन्हा पुढील उच्छाद मांडण्यासाठी हेच गुंड प्रवृत्तीचे लोक तयार असतात.
या संपूर्ण परिस्थितीचा मोठा गैरफायदा धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांचे प्रचंड शोषण करणारे भोंदू घेतात. परंपरा आणि धार्मिकतेच्या नावाने घडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या पथ्यावरच पडतात.
अदृष्टाची भीती, अतृप्त कामनांची पूर्ती, आरोग्यसुविधांचा अभाव, प्रारब्ध-दैव या कल्पनांचा प्रभाव, चमत्कारांवरील विश्वास, गुरुपरंपरा मानण्याची मानसिकता, अगतिकता, अस्थिरता आणि अपराधीपणाची भावना, अवतारकल्पनेवरील श्रद्धा — तसेच भोंदूंनी पैसा, सत्ता, प्रसारमाध्यमे आणि गुंड यांच्या साह्याने निर्माण केलेली दहशत आणि सुसज्ज यंत्रणा — यांमुळे बुवाबाजी हा बिन भांडवली आणि मुबलक बरकतीचा धंदा बनलेला आहे.
पारलौकिक कल्पनांशी जोडून केलेले हे शोषण असल्यामुळे रूढ अर्थाने कायदा तेथे सहजासहजी पोहोचत नाही. त्यामुळे ही बुवाबाजी बिनदिक्कतपणे चालूच राहते.
एका ठिकाणचा भांडाफोड केलेला भोंदूबुवा लगेच काही दिवस थांबून दुसऱ्या ठिकाणी भोंदूगिरीचे दुकान सुरू करतो.
आजही प्रत्येक जिल्ह्यात किमान डझनभर अशा प्रकारचे मोठे भोंदूबुवा सापडतील.
अशाच प्रकारचा एक लिंगपिसाट भोंदू म्हणजे नाशिकचा अशोक कुमार खरात उर्फ तथाकथित ‘कॅप्टन’.
विविध समस्यांनी ग्रासलेल्या महिला-पुरुषांच्या भीतीचा, अज्ञानाचा आणि अंधश्रद्धांचा त्याने गैरफायदा घेतला. परंतु सर्वात संतापजनक आणि किळसवाणी बाब म्हणजे त्याच्या बुवाबाजीला खतपाणी घालणारे आणि ती उघड झाल्यानंतरही तिचे समर्थन करणारे अनेक राजकीय पुढारी, शासकीय-प्रशासकीय अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचा मोठा भरणा आहे. दररोज या प्रकरणांमध्ये नवीन नवीन कल्पनातीत गोष्टी पुढे येत आहेत .
ही अतिशय भयंकर वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे.
अंधश्रद्धा, दैववाद आणि त्यावर केले जाणारे तोडगे यांमधून या भोंदूने प्रचंड संपत्ती जमवली. सध्या पोलीस त्याच्या सर्व करामतींचा त्या आडून जमवलेल्या संपत्तीचा शोध घेत आहेत.
सर्वात हीन आणि मानवतेला कलंक लावणारी बाब म्हणजे या भोंदूने अनेक असाह्य व अगतिक महिलांचे लैंगिक शोषण केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांचा अतोनात मानसिक,शारीरिक छळ केला. त्याबाबत दररोज नवनवीन गुन्हे दाखल होत आहेत.
या कामी त्याला काही प्रभावशाली लोकांची मदत मिळाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे मोठे रॅकेट असण्याचीही दाट शक्यता आहे. कारण त्याला जर शासकीय-प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय सत्तेचे संरक्षण नसते, तर तो इतक्या खालच्या आणि नीच पातळीची कृत्ये करण्यास धजावला नसता.
या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने सर्व बाबींची सखोल चौकशी करून सबळ पुरावे गोळा करावेत आणि संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व विनंती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरुवातीपासूनच व्यक्त केली आहे. यासंदर्भात विशेष तपास पथकाच्या प्रमुखांकडे निवेदनही देण्यात आले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणाची कुणाच्याही दडपणाला न जुमानता निडरपणे,प्रामाणिक व सखोल चौकशी झाली, सबळ पुरावे जमा झाले, तर यात सहभागी असणाऱ्या सर्वांनाच मोठ्या आर्थिक दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र याबाबत अंतिम निर्णय न्यायालयामार्फतच होईल.
आता एक मूलभूत प्रश्न उरतो — भोंदू खरातला शिक्षा झाली, तर अशा प्रकारची भोंदूगिरी खरोखर पूर्णतः थांबणार आहे का?
जर ती थांबणार नसेल, तर त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर कोणत्या ठोस उपाययोजना करायला हव्यात?
अध्यात्माच्या नावाने आज जिल्हा-जिल्ह्यात अशा प्रकारची घातक भोंदूगिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून समाजाचे विविध प्रकारे शोषण तर होतेच परंतु समाजमन दिवसेंदिवस मानसिक गुलामगिरीत ढकलले जाते आणि मोठ्या प्रमाणावर पुन्हा पुन्हा शोषण होत राहते.
विशेषतः महिलांचे लैंगिक शोषण हा त्याचा अत्यंत गंभीर मामला आहे.
याचबरोबर दुसरी बाजूही विचारात घ्यावी लागेल —
खरे अध्यात्म काय आहे? व्यक्ती आणि समाजाची नैतिकता उन्नत करण्यासाठी विविध धर्मांतील कोणती मूल्यें आजच्या काळात अधिक उपयुक्त आहेत?
ती समाजासमोर कोण आणि कशी मांडू शकेल?
धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या भोंदूगिरीचा उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी सर्वसामान्यांना विवेकी विचार आणि त्याबरहुकूम आचार समजावून सांगणे आवश्यक आहे. तसा तो घडतो आहे की नाही त्याची खात्री करणे, त्यासाठी संतपरंपरा, समाजसुधारक आणि भारतीय संविधान यांचा प्रभावीपणे उपयोग कसा करून घेता येईल, याचा विचार करावा लागेल.
देव, धर्म, अध्यात्म यांच्या नावाखाली विधी, कर्मकांड, किंवा अन्य मार्गाने महिलांचे लैंगिक किंवा तत्सम शोषण होत असेल तर ते तातडीने थांबावे म्हणून स्वतंत्र कायदा करण्यासाठी प्रयत्न करावेत का, यावरही सखोल चिंतन व विचारमंथन घडणे आवश्यक आहे.
सतत विवेकाच्या मार्गावर चालणारा नीतिमान समाज व त्यातील प्रत्येक व्यक्ती कसा निर्माण करता येईल? त्यासाठी कोणते कृतीयुक्त कार्यक्रम आखता येतील? त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या योजना आणि साधनांचा अधिक प्रभावीपणे वापर करता येईल? — या सर्व प्रश्नांवर सखोल विचारमंथन होणे गरजेचे आहे.
या विचारांना केवळ चर्चेत न ठेवता ते सर्वसामान्यांच्या आचरणात आणण्यासाठी, दिसण्यासाठी किमान प्राथमिक पातळीवर तरी ठोस विचारमंथन व्हावे आणि त्यातून काही ठोस निर्धार व्यक्त व्हावेत.
राज्य परिषदेत एकमुखाने झालेले किंवा केलेले निर्धार शाखा आणि जिल्हा स्तरावर संघटितपणे समाजापर्यंत पोहोचवून, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म प्रयत्न व्हावेत —
*हीच अपेक्षा आणि भूमिका महाराष्ट्र अंनिसच्या *शुक्रवार दिनांक ३ एप्रिल ,२०२६ च्या नाशिकमधील खुटवड* नगर, नाशिक -त्र्यंबकेश्वर रोड, सिटूभवनात* होणाऱ्या राज्यस्तरीय परिषदेच्या आयोजना मागे आहे.
धन्यवाद.
आपले,
राज्य कार्यकारी समिती,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीए
