
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-२१-
काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उध्दरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥ अवघा तो शकुन। हृदयी देवाचे चिंतन॥१॥ येथे नसता वियोग। लाभा उणे काय मग॥२॥ हरीच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा॥३॥ तुका म्हणे हरीच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा॥४॥ ईश्वराचे नामस्मरण करायला कोणताही मुहूर्त पहाण्याची गरज नाही। जो नामस्मरणात तल्लीन आहे त्याला कोणत्याही दिशा, काळ वेळ शुभाशुभ शकुन हे काहीच पहाण्याची गरज नाही। त्यसाठी सर्वच दिशा, सर्वच काळ शुभ असतात।
इतर सर्व साधनांना काळ वेळेचे बंधन नियम असतात। परंतु, भक्तीमार्गात नामजप संकीर्तन हेच एकमेव असे साधन आहे की त्याला वेळेकाळाचे बंधन नाही। विष्णु चे नामसंकीर्तन करण्यास कोणत्याही काळाचा देशाचा निर्बंध नाही। यज्ञ, दान तप स्नान जप यांना नियम आहेत, परंतु, नामस्मरणाला कोणताही नियम नाही।
दोन्ही पक्ष पाहीं उध्दरती- भक्तीने, नामस्मरणाने दोन्ही पक्षांचा म्हणजे आई कडील कुळ व वडीलांकडील कुळ, दोन्हीकडील संपूर्ण वंशाचा ऊध्दार होतो।
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण- नाम हे एकाच वेळी सर्व दोषांची निवृत्ती करण्यास समर्थ आहे। नामात शुध्दीकरणाचे प्रचंड सामर्थ्य आहे। गुरुमुखी मंत्र, नाम।
जडजीवां तारण हरि एक- जड जीव म्हणजे अज्ञानी जीव, या अज्ञानी जीवांना नामस्मरण तारुन नेते। सर्वांचा ऊध्दार करण्यास फक्त परमेश्वरच समर्थ आहे।
हरिनाम सार जिव्हा या नामाची- या असार अशा संसारात हरिनामच एकमेव सार आहे। अशा या नामाची ज्याच्या जिभेला उच्चाराची सतत जपण्याची सवय झाली ती हरिनाम जपणारी जीभ धन्य आहे। ज्याच्या जीभेला अखंड हरिनाम जपण्याची सवय झाली तो धन्य आहे। त्याच्या भाग्याला दुसरी उपमाच नाही।
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा- ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर हरिपाठ सांग झाला, म्हणजे संपूर्ण यथसांग झाला तर पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा होतो। नामस्मरण पूर्ण श्रध्देने, प्रेमाने, दृढ निश्चयाने करणे, म्हणजे परिपूर्ण होणे म्हणजे सांग होणे, यथासांग होणे। त्याचे फळ त्याचा ऊध्दार तर होतोच पण त्याच्या सर्व पूर्वजांचा ही ऊध्दार होतो। त्यांनाही वैकुंठाचा मार्ग सुलभ होतो।
[14-01-2023]
