
नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याचा धार्मिकतेच्या आड लपलेला ‘अश्लील’ चेहरा समोर आला आहे. स्वत:ला ‘कॅप्टन’ आणि ‘ज्योतिष तज्ज्ञ’ म्हणवून घेणाऱ्या खरातवर एका महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ दरम्यान, धार्मिक विधी आणि दैवी शक्तींचा बहाणा करून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा विश्वास जिंकल्यानंतर, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आरोपीवर आहे.
खरातने एका पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नाशिक गुन्हे शाखेने याप्रकरणी त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात खरातच्या पेनड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील त्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
अशोक खरात याच्यावर महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी खरात याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसची तपासणी केली असता एक पिस्तूल, काही संशयास्पद कागदपत्रे, काडतुसे सापडले आहेत. खरातविरुध्द सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात अश्लील चित्रफित समाज माध्यमात टाकण्याची धमकी आणि पाच कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरुन तसेच शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील छायाचित्र समाज माध्यमात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला असल्याने स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील अशोक खरातविरुध्द एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यावर त्याचे बिंग फुटले. धार्मिकतेच्या आड लपलेला त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष असलेल्या खरातने अंकशास्त्राची जाण आणि राजकीय वर्तुळातील वावर या जोरावर अनेकांवर अत्याचार केल्याचे, धमकी देत लुबाडल्याचे उघड होऊ लागले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
राजकीय कनेक्शन:
अशोक खरात हा राजकीय वर्तुळातही वावरत असे. त्याने स्थापन केलेल्या ‘शिवनिका’ संस्थेत रुपाली चाकणकर या संचालक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून,राज्यातील अनेक नेत्यांनी खरातच्या
दरबारी हजेरी लावल्याचे व्हिडिओ व चित्रफिती समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातकडे आपले राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमधील उच्चपदस्थांचा समावेश आहे. त्यामुळेच हिंमत वाढलेल्या खरातने कोट्यवधींची माया जमविण्यासह अनेक अनुचित प्रकार केल्याचे उघड होऊ लागले आहे. खरातच्या कार्यालयातून पोलिसांना सापडलेल्या ५८ चित्रफितींमध्ये राजकीय मंडळींसह विविध क्षेत्रातील नामांकित महिलांचीही माहिती व चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भोंदू खरातचे परराज्यातही अनेक भक्त असून खरातचे लागेबांधे अनेक उच्चपदस्थांशी असल्याचे सांगितले जाते. केंद्रासह राज्यातील काही मंत्री, हरियाणा, राजस्थानसह इतर राज्यातील मंत्री, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे काही नेते खरातचे पाईक असल्याचे सांगितले जाते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे -पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबरोबरचे खरातचे छायाचित्रे समाज माध्यमात आल्याने हे नेतेही खरातच्या आहारी गेले होते की काय, अशी चर्चा सुरु आहे. कारण, खरातच्या मंदिरात एकनाथ शिंदे येऊन गेल्यानंतरच तो अधिक प्रसिध्दीत आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर शिवनिका संस्थानमध्ये विश्वस्तच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
पोलिसांनी आरोपीच्या लपण्याच्या ठिकाणांहून मोठी मालमत्ता, रोकड, शस्त्रे आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, त्याने गेल्या १५ वर्षांत अंदाजे २०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वपूर्ण खुलासे समोर येऊ शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
९५६१५९४३०६
