नाशिक:( प्रतिनिधी )- हातात भगवद् गीता आणि काळजात भक्तिविचार घेऊन स्वाध्यायसूर्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वाध्यायगंगा विश्वमंदिरात अखंड प्रवाही केली. ज्येष्ठ स्वाध्यायी सावळीराम तिदमे यांनी 'स्वाध्यायातील अमृतानुभव' या ग्रंथात स्वाध्याय कार्यावर स्वानुभवसंपन्न वृत्तीने प्रकाश टाकला आहे. स्वाध्यायसारख्या महान विचारांचे कार्य नेहमीच यशस्वी होते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि स्वाध्यायी सावळीराम तिदमे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथतुला आणि वैशाली प्रकाशन, पुणे प्रकाशित श्री.तिदमे यांच्या 'स्वाध्यायातील अमृतानुभव' या ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रकाशक विलास पोतदार आणि रंजना तिदमे उपस्थित होत्या.
श्री.धर्माधिकारी पुढे म्हणाले की, या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साक्षात पांडुरंगशास्त्री आठवलेदादा आहेत. त्यामुळे आपण भरून पावलो आहोत. मी खूप भाग्यवान आहे की, मला दादा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. मी स्वतः स्वाध्यायी असल्यामुळे या कार्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.
प्रकाशक विलास पोतदार, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती नानासाहेब महाले, ज्येष्ठ संमोहनतज्ज्ञ डॉ.शैलेंद्र गायकवाड, अभिनेते किरण भालेराव, रोहिले गावचे उपसरपंच सचिन तिदमे, रश्मी हिरे-बेंडाळे, योगेश तिदमे यांच्यासह सावळीराम तिदमे यांची नातवंडे रूद्र, सोहम, स्वरा, वीर, वैष्णवी, वेदांत यांनी आपल्या मनोगतातून श्री.तिदमे यांच्या कार्याचा गौरव केला. श्री.तिदमे यांच्या ग्रंथतुलेतील ग्रंथ उपस्थितांना सस्नेह भेट देण्यात आल्याने ७०० कुटुंबात स्वाध्याय अक्षरधन अक्षरप्रसाद स्वरूपात पोहोचले. सावळीराम तिदमे यांनी आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत स्वाध्यायकार्य, पर्यावरण रक्षण आणि लेखनाने जीवनाला दिशा मिळाल्याचे सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश तिदमे, निलेश तिदमे यांनी स्वागत केले तर नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.