
नांदगाव:-( प्रतिनिधी)– मविप्र संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २३ मार्च रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाप्रीत्यर्थ ‘शहीद दिन’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी क्रांतीकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन केले.
इयत्ता पाचवीमधील विद्यार्थी कु. शिंदे आणि कु. काकळीज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्रांतीकारकांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. “आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, ते या वीरपुत्रांच्या बलिदानामुळेच मिळाले आहे,” अशा भावना या चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून मांडल्या.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, “केवळ घोषणा देणे म्हणजे देशप्रेम नाही, तर विद्यार्थ्यांनी शिस्त पाळून, मन लावून अभ्यास करून एक आदर्श नागरिक बनणे हीच शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल. आजच्या तरुण पिढीने या क्रांतीकारकांचा त्याग आणि शौर्याचा वारसा पुढे चालवला पाहिजे.”
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कवडे यांनी केले.
