
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥ गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-२०-
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्व मार्गा सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥ नामसंकीर्तन हीच वैष्णवांची जोडी म्हणजे ठेवा आहे। विष्णु म्हणजे सर्वव्यापी परमेश्वर। विष्-वेवेष्टि सर्वं जगत् अशी विष्णु शब्दाची व्युत्पत्ती आहे। वैष्णव म्हणजे या सर्वव्यापी ईश्वराचा अनन्यभक्त। ईश्वराचे सतत नाम संकीर्तन हेच त्यांचे व्यसन। तुकाराम महाराजांनी वैष्णव शब्दाची व्याख्या केली, “वैष्णव तो जया। अवघी देवावरी माया॥१॥ नाही आणिक प्रमाण। तन धन तृण जन॥ पडता जड भारी। नेमा न टळे निर्धारी॥२॥ तुका म्हणे याती। हो का तयाची भलती॥३॥ ” खरा वैष्णव फक्त देवावरच निष्काम प्रेम करतो। जगातील धन, संपत्ती, जन्म, कुळ, इतर कशावर ही त्याची आसक्ती नसते। काही झाले तरी तो आपला नित्यनेम, दैनंदिन साधना टळू देत नाही। कोणत्याही परिस्थितीत आपली नित्यनेमाची साधना करतोच।
पापे अनंत कोडी गेली त्यांची- अखंड नामसंकीर्तना मुळे त्यंची कोट्यावधी पापे नाहीशी झाली। अग्नी च्या संपर्कात गवत जळून जाते त्याप्रमाणे ईश्वर नामजपाने पापे नष्ट होतात।
अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ- ईश्वराचे नाम मुखात येणे ही काही साधी गोष्ट नाही। अनंत जन्मांच्या तपाचे ते फळ आहे। जयाचिये वाचे पुढा भोजे। अखंड नाम नाचत असे माझे। जे जन्म सहस्री वोळगीजे। एकचेळ यावया॥ज्ञानेश्वरी॥अ-९॥ जन्मांतर सहस्रेषु तपोज्ञानसमाधिभि:। नराणां क्षीणपापानां कृष्णे भक्ति: प्रजायते॥श्वेताश्वतर उपनिषद् शांकर भाष्य॥ अनेक जन्म तपश्चर्या करुन, ज्ञान, समाधी चा अभ्यास करुन ज्यांची पापे नष्ट झाली आहेत तेव्हाच त्यांना हरिभक्ती ची आवड लागते।
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना। श्रध्दावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः।।६-४७।। योगी श्रेष्ठ आहेच परंतु, योग्यांमध्ये सुध्दा जो माझी अनन्यभक्ती करतो तो सर्वश्रेष्ठ आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगीतले आहे। योगापेक्षाही भक्ती श्रेष्ठ आहे।
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं- नामसंकिर्तनात सर्व सिध्दींचा अंतर्भाव होतो, इतके श्रेष्ठ फल देणारे असूनही सर्वात सोपे साधन आहे। सर्व मार्गा सुगम हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला यज्ञ, याग, क्रिया, धर्म, हे सर्व हरीच आहे। त्यावाचून मी कोणताच दूसरा नियम जाणत नाही। अहं क्रतुरहं यज्ञ:।गीता-९॥ हरि स्वत: धर्म आहे। हरी हा स्वत: यज्ञरुप आहे, धर्मरुप आहे, “धर्माची तू मूर्ती। पापपुण्य तुझे हाती॥१॥” हरी म्हणजे ईश्वरात सर्व योग, याग, क्रिया कर्म धर्म सामावलेले आहेत, त्यामुळे ज्याची हरी वर नितांत श्रध्दा आहे, त्याला हरी शिवाय दुसरे कोणतेच नेम धर्म पाळण्याची गरज नाही। हरीत सर्व काही आहे। हरीच सर्वस्व आहे।
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा. [13-01-2023]
