
वाघोली (जि. पुणे) येथे आयोजित महाराष्ट्रकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आणि ६८ वा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला. या स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनी उपविजेतेपद पटकावले. या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे देखील उपस्थित होते.

राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी विजेत्यांना आणि सहभागी सर्व स्पर्धकांना ध्वनीचित्रफीतीद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्पर्धेतील मोठ्या सहभागाचे कौतुक करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत ४० लाखांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे नमूद केले. राज्यातील कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या दमदार विजयामुळे नाशिकच्या क्रीडाक्षेत्रात अभिमानाची भर पडली असून हर्षवर्धन सदगीर यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या जिद्द, मेहनत आणि उत्कृष्ट खेळीमुळे त्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या मातीचा दरारा महाराष्ट्रभर अधोरेखित केला आहे.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
