परीक्षण- नरसिंग इंगळे

मागच्या रविवारी 15 मार्च 2026 रोजी पुण्यात सावरकर अध्यासन केंद्रात आजच्या पिढीतल्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ कवी माननीय शशिकांत तिरोडकर यांच्या *मिठी नंतरच्या कविता* संग्रहाचं ज्येष्ठ साहित्यिक कवी माननीय रामदास फुटाणे, अशोक नायगावकर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात प्रकाशन झाले. त्या प्रसंगाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले.
आता मिठी म्हणजे शशिकांत तिरोडकर व शशिकांत तिरोडकर म्हणजे मिठी हे मराठी काव्य विश्वात एक घट्ट समिकरण झाले आहे. तिरोडकर सर म्हणजे एक हरहुन्नरी दिलखुलास व सतत माणसं जोडणारं व्यक्तिमत्त्व आणि ते आता तब्बल एकवीस वर्षांनंतर रसिकांसाठी कवितेची एक छप्पन्न भोग थाळी घेऊन आलेत. त्यात निसर्ग आहे, प्रेम आहे, आई वडिलांप्रति प्रेम आहे, ज्वलंत सामाजिक विषय व मुख्य म्हणजे बालकवितांही आहेत. इतक्या वर्षाचा त्याचा जीवनानुभव, निचोड, सार, परिपक्वता त्यात आहे. ह्यावरून कवीचा जीवनाकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन दिसून येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट ह्या आपल्या जन्मगावाच्या मघाळ गावातल्या मघाळ माणसांचं
*गरीब होते गाव माझे*
*माणसे होती खरी*
*पाहुणा कुणीही असू द्या*
*सरबराई सगळ्या घरी.* असं वर्णन करतात. आणि गावाच्या मातीचा हा गुण कवीमधेही ओसांडून वाहतो आहे.
ते काही जन्मताच आपल्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत. कष्ट घामाचं मोल ते पुरेपूर जाणून आहेत. ते आपल्या मनोगतात म्हणतात “मुंबईत राहण्यासाठी अतोनात कष्ट उपसून घाम गाळणारी माणसे पाहिली आणि जगण्याचे भान आले”. आणि त्यासोबतच त्यांच्या कवितेनेही कूस बदलली. कष्टकऱ्यांच्या आतड्यांची पीळ व घामाचे थारोळे त्यांना स्पष्ट दिसू लागले व ते आपोआपच त्यांच्या लेखणीतून कागदावर उमटू लागले.
नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन मधे ते मोठ्या पदावर काम करताना गिरणी कामगारांचा संप त्यांनी जवळून पाहिला.
एक दिवसाआड पेटू लागल्या
गिरणगावातल्या चुली
शाळा सोडून घरी बसल्या
गुणी हुशार मुली
आणि,….
मिल गेल्या मॉल झाले
कामगारांचे हाल झाले…
अशा शब्दांत गिरणी कामगारांच्या संपाचे दाहक वर्णन करतात.
तिरोडकर सरांची लेखणी माणुसकीने ठासून भरलेली आहे. माणसांतील धर्म जातीपातीच्या उतरंडीची चीड ते
मातेच्या उदरी धर्म मिळाला
ही कसली सद्गती होती
धड डोळे ही उघडले नव्हते
अन जात चिकटली होती….. अशी व्यक्त करतात. आणि जातीवर उतारा म्हणून
धरा उंच पालखी
आनंदाचे भोई होऊ
जातीपाती रंक राव
भेदभाव दूर ठेऊ. असा निर्धार करतात
कवीची अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर बारीक नजर आहे, सजग भान आहे. त्यांच्या लेखणीत बऱ्याचवेळा स्त्रैण भाव दिसतो. आणि माझ्या मते हे संतत्ववाचं लक्षण आहे. ते लिहितात
तुला वाचविण्या तिला वाचवावे
स्त्रीभ्रूण हत्या पुढे शाप होई.
तिरोडकर सर खरंच खूप प्रेमळ माणूस, मग प्रेमाचा गारवा देणाऱ्या
तुझ्या गोडुल्या ओठांमधला
तीळ भिजावा
इतका आपुल्या दोघांमधला
स्नेह रुजावा
ह्या ओळी अगदी सहजी त्यांच्या लेखणीतून उतरतात.
कविता त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. हे त्यांच्या देहबोलीतून अगदी स्पष्ट जाणवते. किंबहुना त्यांच्या अख्ख्या जीवनालाच कवितेचं कोंदण लाभलंय.
ते शब्दांशी पूर्णपणे तादात्म्य पावले आहेत. त्यांची लेखणी सदैव सृजनशील आहे. याची खात्री ते अशी देतात…..
शब्दांच्या आरशात तुम्ही
कायम तस्सेच दिसाल
कवी म्हणून लेखक म्हणून
अगदी तरूण दिसाल
कवी तिरोडकर सरांच्या तारुण्याचं हेच तर गमक आहे. एकूणच नितीन हिरवे यांच्या संवेदना प्रकाशनने मिठी नंतरच्या कविता ह्या संग्रहातील सर्वच कविता पुनःपुन्हा वाचनीय आहेत. सरांची लेखणी सदैव तरूण राहो आणि नवनिर्मिती करो व रसिकांना तृप्त करण्यासाठी त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, ते दशग्रंथी होवो हीच सदिच्छा.
