
नाशिक:-( प्रतिनिधी )माणसाच्या मनात अनेक प्रश्नं निर्माण होतात. तेच प्रश्न मनात घर करून राहतात. हे मनावरचं ओझं कमी करण्याचं कार्य कविता करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री हिरा वकारे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात २४१वे पुष्प ‘हिरकण्या’ या काव्यसंग्रहावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील होते.
हिरा वकारे पुढे म्हणाल्या की, समाजातील विविध प्रसंगात आपण काय करतो; याचे वास्तव चित्रण मांडताना काही प्रश्न सुटले आणि काही सुटले नाहीत, अशी खंत व्यक्त केली. जीवनात अनेक वादळं येतात. त्यात आपण उद्ध्वस्त होतो. पण त्यातून पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ताकद शब्द देतात. कवीसह वाचकालाही कविता उभारी देत असते, असेही त्या म्हणाल्या.
गझलकार बाळासाहेब गिरी आणि विडंबनकार संजय आहेर यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर गिरी यांनी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (२४) प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी ‘योग-एक जीवनशैली’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
