
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) HPV( ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) मुलींमध्ये गर्भाशयमुखाचा कॅन्सर आजार रोखण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरलेली परंतु अनेक गैरसमजातून व विविध प्रकारच्या अफवा पसरल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली प्रतिबंधात्मक लस पात्र लाभार्थी मुलींना देण्याचा शुभारंभ न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकताच करण्यात आला.

अनेक निरर्थक व गैरसमजाधून पसरलेल्या अफवांमुळे ही लस टोचून घेण्यासाठी मुली पुढे येत नव्हत्या परंतु न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच या आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अशा ताई (आशा वर्कर) यांनी व्यापक जनजागृती करून पात्र मुली व त्यांचे पालक यांना या लसीचे महत्व पटवून देत गैरसमज दूर केल्याने अनेक मुलींनी उस्फूर्तपणे लस घेऊन इतरही मुलींनी ही लस घ्यावी असे आवाहन (सोशल मीडिया ) समाजमाध्यमावरून केले आहे . नांदगाव तालुक्यातील हा पहिला यशस्वी प्रयोग ठरला आहे.

भारतातील महिलांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्व सामान्य आढळणारा कर्करोग आहे. दरवर्षी सुमारे १,२३,००० नवीन रुग्ण आढळतात आणि साधारण ७७,००० मृत्यू या आजारामुळे होतात .क्रमवारी नुसार १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात मोठा कर्करोगाचा आजार आहे .जगात आढळणाऱ्या दर ५ नवीन रुग्णांपैकी १ रुग्ण भारतीय असतो .त्याचे मुख्य कारण: ९५% पेक्षा जास्त केसेस ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतात . प्रतिबंध: लसीकरण आणि नियमित तपासणी (Screening) याद्वारे हा आजार टाळता येतो. भारतामध्ये Gardasil या नावाचे शासनामार्फत मोफत लसीकरण चालु झाले आहे. प्रादेशिक परीस्थिती नुसार भारतातील काही भागांत, विशेषतः अरुणाचल प्रदेशातील “पापुमपारे” जिल्ह्यात याचे प्रमाण आशियात सर्वाधिक आढळून आले आहे .
यावेळी लस घेतलेल्या मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले. व त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आशा सेविकांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मा.वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरची लसीकरण मोहीम नियमित सुरू राहणार असल्याने जास्तीतजास्त मुलींनी ही लस घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र न्यायडोंगरी च्या वतीने करण्यात आले आहे.
