
नांदगाव(प्रतिनिधी):येथील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्षा सौ. संगीता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला असून, आगामी काळात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर भीक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय या ठिकाणी एकमताने घेण्यात आला.
या बैठकीतशालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना होणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करून राज्य सरकारने शासकीय आश्वासनाची पायमल्ली केली असून १००० रुपयांच्या वाढीची अंमलबजावणी रखडली आहे यामुळे या बैठकीत महिलांनी सरकारप्रती तीव्र संताप व्यक्त केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या मानधनात १००० रुपयांची वाढ जाहीर केली होती. मात्र, विद्यमान सरकारने अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. महिलांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सरकारच्या या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी, येत्या ५ एप्रिल रोजी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. “आम्ही भीक मागून जमा झालेले पैसे सरकारला देऊ, पण आमच्या हक्काच्या मागण्या मान्य करा” असा आक्रमक पवित्रा यावेळी महिलांनी घेतला आहे. या बैठकीला सचिव आशाबाई काकळीज मनीषा भाबड. शैला भाबड सुमित्रा शिंदे सरला मोढे कविता मोरे मगल देसले संगीता गुंजाळ कुसुम मगर सरूबाई पुजराम दळवी यांच्यासह आधारवड संस्थेच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिलांचा सन्मान आणि संविधान जागर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बैठकीत उपस्थित महिलांना भारताच्या संविधानाची उद्देशिका भेट देऊन गौरवण्यात आले. महिलांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहावे आणि संविधानाने दिलेल्या मूल्यांची जोपासना करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी उपस्थित महिलांनी कामातून येणाऱ्या अडचणीना संविधानिक मार्गाने सोडवण्यासाठी आता आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी आणि त्यांच्या इतर रास्त मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने, आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचे ठरले असुन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर येत्या ५ एप्रिल रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या हक्काच्या मानधनासाठी महिलांना रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधून घ्यावे लागणार आहे आणि जमा झालेले पैसे आम्ही सरकारला मनी ऑर्डर करू
सौ संगिता सोनवणे अध्यक्षा आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था…
