
भोंदू कॅप्टन अशोक खरातवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना निवेदन देताना अंनिस चे कार्यकर्ते.
स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि राजकीय ज्योतिषी म्हणवून मिरवणारा अशोक खरात याला नाशिक क्राईम ब्रँच युनिट एक यांनी बलात्कारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यात अटक केली.
खरंतर, मागील तब्बल २५वर्षांहून अधिक काळापासून या भोंदूने नाशिक शहर तसेच इतरत्र बड्या बड्या लोकांना भविष्य वर्तवण्याचा बहाणा करून, त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले असल्याची महाराष्ट्र अंनिसला दाट शंका होती. म्हणून त्याच्या आजपर्यंतच्या सर्व गैर कृत्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह त्याच्याशी संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आलेले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की.
मोठ-मोठे प्रतिष्ठित लोक तसेच बडे राजकीय नेते मंडळी ह्या भोंदूच्या पाठीमागे असल्याने त्यांचे ,त्याला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असावे .
त्यामुळे त्याने नाशिक सह, सिन्नर तालुक्यातील एका गावात मोठ्या प्रमाणात हा ज्योतिष सांगण्याचा आणि विविध धार्मिक कर्मकांड करण्याच्या नावाखाली लोकांचे, विशेषतः महिलांचे शोषण करण्याचा उद्योग वाढवला.
नोव्हेंबर, 2022 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांच्या काही सहकाऱ्यांसह ज्योतिष जाणून घेण्यासाठी सदर भोंदूकडे गेले असल्याचे समजले होते. त्यावेळी महाराष्ट्र अंनिसने ही बाब उघड केली होती आणि निषेध नोंदवला होता. तरीही या भोंदूवर त्यावेळी काहीही कायदेशीर कारवाई झाली नाही.
कॅप्टन अशोक खरात यांनी जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचे महाराष्ट्र म्हणणे आहे.
ह्या भोंदूकडे ५८रहस्यमय व्हिडिओ सापडल्याचेही समजते.
त्यामध्ये अनेक बड्या बड्या हस्ती तसेच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची दाट शंका आहे.
त्यामुळे साहजिकच पोलिस तपासयंत्रणेवर राजकीय दबाव येण्याचाही दाट शंका अंनिसने व्यक्त केली आहे.
म्हणून आपण अतिशय सावधगिरीने या भोंदूच्या विरोधातले सर्व सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह ह्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून झालेल्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
असे घडल्यास आज मितीला जोरात सुरू असलेल्या ज्योतिषांच्या भंपकबाजीला आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल . तसेच लोकांमध्येही ज्योतिषाचा फोलपणा लक्षात येईल , अशी अपेक्षा अंनिसने व्यक्त केलेली आहे
निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ.टि.आर.गोराणे , राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, कोमल वरदे, महेंद्र दातरंगे आदींच्या सह्या आहेत.
