
सावळीराम तिदमे यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा
नाशिक( प्रतिनिधी ) -समाजाचा आरसा असणाऱ्या वृत्तपत्रांतील पत्रकारांना महत्त्वाचे स्थान असते. तसेच समाजाला दिशा देणाऱ्या साहित्यिकांनी समाज घडत असतो. म्हणूनच पत्रकार आणि साहित्यिक हेच खऱ्या अर्थाने समाजसेवक असतात. त्यामुळे पत्रकार आणि साहित्यिकांचा सत्कार हा खरोखरच आनंदसोहळा आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ विनोदी साहित्यिक नरेश महाजन यांनी काढले
ज्येष्ठ साहित्यिक आणि स्वाध्यायी सावळीराम तिदमे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित संपादक, साहित्यिकांच्या कृतज्ञता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, मानवधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रकाश कोल्हे, ज्येष्ठ संपादक राहुल रनाळकर, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, संयोजक सुरेश पवार व्यासपीठावर उपस्थित होते
श्री.महाजन पुढे म्हणाले की, वर्षानुवर्षे अंतर्नादच्या माध्यमातून ब्रह्म मुहूर्तावर नाशिककरांच्या विचारांची भूक भागवणारे श्री.तिदमे यांच्याबद्दल आपल्या प्रत्येकाला आदर आहे. माजी आ.नानासाहेब बोरस्ते यांनी आपल्या भाषणात साहित्यिक आणि समाज यांच्यात प्रेमाचा सेतू बांधत स्वतःच्या अमृत महोत्सवानिमित्त संपादक-साहित्यिकांचा केलेला सन्मान हा अनुकरणीय पायंडा आहे, असे मत मांडले. डॉ.प्रकाश कोल्हे यांनी सूर्योदयापूर्वी ‘अंतर्नाद’च्या माध्यमातून आपल्या विचारांचा प्रकाश पेरणारे श्री.तिदमे हे खऱ्या अर्थाने दिशादर्शक व्यक्तिमत्त्व आहे, असे सांगितले
दैनिक पुढारीचे नाशिक आवृत्तीचे संपादक डॉ.राहुल रनाळकर, साप्ता.कुसुमाग्रज नगरचे संपादक रामदास नागवंशी, व्यासपीठ दिवाळी अंकाचे माजी कार्यकारी संपादक विवेक उगलमुगले, सुभाषितचे संपादक सुभाष सबनीस, सर्वस्पर्शीचे संपादक ब्रिजकुमार परिहार यांच्यासह साहित्यिक योगाचार्य जे.के.गावले, रमेश वाघ, चंद्रकांत कानकाटे, के.व्ही.कुलकर्णी, राजीव पटेल, प्रा.सुमती पवार, प्राचार्या सविता कुशारे, ॲड.मिलिंद चिंधडे, अलका दराडे, अशोक धर्माधिकारी, पुंजाजी मालुंजकर, सुशीला संकलेचा, भावेश ब्राह्मणकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, पद्माकर देशपांडे, प्राचार्य प्र.द.कुलकर्णी, शरद घोडके, अशोक पवार,तुकाराम ढिकले, डॉ.यशवंतराव पाटील, रामचंद्र शिंदे,प्रशांत जुन्नरे, सेवानिवृत्त न्यायाधीश वसंत पाटील, पत्रवारीकार दत्ता कोठावदे, बाळकृष्ण वाडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देत सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
निलेश तिदमे आणि नगरसेवक तथा शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी स्वागत केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी प्रास्ताविक केले. उत्सवमूर्ती सावळीराम तिदमे यांनी कृतज्ञता आभार मानले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
