
(नाशिक, ओढा वार्ताहर – दिलीप नारद)
श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच लव-अंकुश यांच्या जन्मभूमीशी ऐतिहासिक नाते सांगणाऱ्या नाशिक पंचवटी परिसरातील ओढा (ता. जि. नाशिक) या गावात भाविकांच्या वर्गणीतून भव्य असा ४१ फुटी त्रिशूळ हेमाडपंथी महादेव मंदिरासमोर उभारण्यात आला आहे. काळाराम मंदिराचे संस्थापक रंगनाथराव ओढेकर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या पावन भूमीत ग्रामस्थांनी हिंदू संस्कृती आणि भक्तीपरंपरेचा वारसा जपत हा धार्मिक उपक्रम राबविला आहे.
या निमित्ताने ओढा गावातील नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिरात जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शुभहस्ते भव्य कलशारोहण सोहळा, श्री गणेश याग, वास्तुपूजन, होम, कीर्तन व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दि. १८ मार्च २०२६, बुधवार रोजी सकाळी गणेश पूजन, कलश स्नान व कलश मिरवणुकीने होणार आहे. दि. १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी देवता स्थापना, श्री गणेश याग व होम होणार असून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. वाणीभूषण श्री तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री), परळी वैजनाथ यांचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २० मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते लव-अंकुश कुटीचे वास्तुपूजन व मंदिराचे कलशारोहण होणार आहे. तसेच सकाळी १० वाजता राष्ट्रसंत श्री स्वामी जनार्दन महाराज पालखी व जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर होमाची पूर्णाहुती, प्रवचन व महाप्रसाद होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओढा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 🙏
