वादळाचा वार हो,पाऊसाची धार हो।फोड बांध-बांधाच्या पार हो।।

स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी बहरला आंबेडकरी शाहिरी जलसा :
देशवंडी ता.सिन्नर (प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री .संजयभाऊ शिरसाठ यांच्या पुढाकाराने व लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकच्या सततच्या पाठपुराव्याने देशवंडी ता. सिन्नर लोककवी डॉ.वामनदादा कर्डक यांचे जन्म गावी नियोजित स्मारक उदघाटन प्रसंगी लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक प्रा.शरद शेजवळ व प्रा.डॉ.किशोर वाघ,कुणाल वराळे प्रस्तुत आंबेडकरी शाहिरी जलसा गीताने भूमिपूजन कार्यक्रमात नवचैत्य निर्माण केले.

आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक पितामह लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांचे देशवंडी ता. सिन्नर येथे भव्य स्मारक लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र व तमाम आंबेडकरी जनतेच्या मागणीस अनुसरून उभे राहत आहे याबद्दल महाराष्ट्र शासनाचे लोककवी डॉ. वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून सदर स्मारक हे आंबेडकरी,परिवर्तनवादी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून विकसित करू अशी ठाम भूमिका लोककवी डॉ.वामनदादा कर्डक यांच्या हयातीत व कायदेशीर अनुमतीने स्थापित झालेल्या लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान चे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी स्मारक भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी जलशा गीतांचा सादरीकरण प्रसंगी व्यक्त केली.

तुफान आतले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे।जळू परंतु धरती उजळून प्रकाश येथे असाच उधळू सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे।।
ह्या गीतासह जगातली देखणी,बाई मी भिमाची भिमाची लेखणी।।
वादळाचा वार हो।पावसाची धार हो। फोड बांध बांधाच्या पार हो।।पायदळी आज तू पडू नको।
पडू नको आज तू सडु नको।।
हो नवा निर्धार हो चळवळीचा सार हो।आज तरी तलवारीची धार हो।।
बोधिवृक्षा मला लागली ओढ तुझी।
साऊली गोड तुझी साऊली।।

ह्या सह वामनदादा कर्डक यांच्या अनेक लोकप्रिय गीतानाचे सादरीकरण करण्यात आले.योगेश मोरे (तबला),दिलराज मोरे (ढोलक) दुष्यंत वाघ हार्मोनियम शाहीर दीपक साळवे गायिका दिपाली गांगुर्डे गायिका आरती खरात यांनी साथ संगत केली.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे सांस्कृतिक साहित्यिक योगदान लक्षात घेऊन नाशिक जिल्हा परिषदेने सन २००६-०७ मध्ये ५३ गुंठ्याच्या जागेवर वामनदादा कर्डक यांचे स्मारक तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कातकाढे यांच्या ठरावातून देशवंडी हा त्यांच्या जन्म गावी उभारले. निधी अभावी गेले अनेक वर्ष हे काम आधी अधुरे राहिले होते.प्रतिष्ठानचे संचालक मंडळ,देशवंडी कर नागरिक प्रा.शरद शेजवळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व सल्लागार किशोर वाघ व कर्डक परिवाराच्या वतीने या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी सातत्याने सरकारी अधिकारी व मंत्र्यांशी पाठपुरावा केला जात होता. सदर स्मारकाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री.संजयभाऊ शिरसाठ यांनी पुढाकार घेऊन दहा एकर जागा अधिकृत करून हे भव्य दिव्य स्मारक पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे,त्याबद्दल महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय विभाग व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचे लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक या संस्थेचे संस्थापक प्रा.शरद शेजवळ यांनी अभिनंदन केले असून काही प्रमुख मागण्या या निमित्त महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
प्रमूख मागण्या :
१) लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक हे आंबेडकरवादी-मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून विकसित करण्यात यावे.
२) स्मारकामध्ये वामनदादा कर्डक यांच्या वस्तू व साहित्य संकलित करून त्याचे भव्यसंग्रहालय स्मारकात स्थापित यावे.
३) स्मारकांमध्ये भव्य वाचनालय अभ्यासिका विकसित करण्यात यावी.वामनदादांचे साहित्य संशोधन प्रबंध येथे वाचनास मिळावे.
४) देशवंडी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेला लोककवी वामनदादा कर्डक यांचे नांव देण्यात यावे.
५) महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांसह शालेय पाठ्यपुस्तकात वामनदादा कर्डक यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे त्यांचे काव्यसंग्रह व समग्र साहित्य प्राथमिक स्तरापासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत अभ्यासले जावे. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे.
सदर मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री,शालेय शिक्षण मंत्री,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना देण्यात आले आहे.निवेदनावर प्रा.शरद शेजवळ,प्रा.डॉ.किशोर वाघ,डॉ.सचिन बोर्डे,तारका जाधव,वनिता सरोदे-पगारे,सचिन शिराळ,दीपक शिंदे,अतुल डांगळे यांच्या सह्या आहेत.
