

लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक
॥आत्मा मालिक गुरु ओम्। गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग-१७
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥
जो हरिपाठ कीर्ती मुखाने गातो, त्याचा देह पवित्र होतो। “पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्वकाळ॥१॥तयाच्या चिंतने तरतील दोषी। जळतील राशी पातकाच्या॥२॥
तुका म॥” हरिपाठकीर्ती म्हणजे हरीच्या नामस्मरणाचे महत्व जो गातो, चिंतन करतो, त्याचा देह पवित्र आहे कारण नामजपामुळे ईश्वरीय शक्ती त्याच्यात प्रगट होते। “अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा। य: स्मरेत् पुंडरिकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि:॥१॥“ मनुष्य पवित्र असो वा अपवित्र असो, कोणत्याही अवस्थेत असो, जो परमेश्वराचे स्मरण करतो, तो अंतर्बाह्य पवित्र च असतो॥१॥“ असा ही एक श्लोक आहे। हा श्लोक म्हटला की मनुष्य पवित्र होतो। शिचिर्भूततेसाठी हा मंत्र म्हटला जातो। तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे- या नामस्मरणरुप तपाचे सामर्थ्य असे आहे कि, ज्याने हे केले, त्याने अमूप, खूप न मोजता येण्या इतके तप केले असे होते। या तपाने हा ईश्वरभक्त चिरंजीव कल्प म्हणजे अनंत काळ, चिरकाल वैकुण्ठात राहातो। ईश्वरा सन्निध ईश्वर होऊन राहातो। वैकुंठ हा भगवंताचा वास्तव्य करण्याचा लोक आहे। अशा या वैकुंठात हरिभक्त चिरंजीव होऊन कल्प-अनेक वर्षे राहातो। सलोकता समीपता हे मोक्ष वैकुंठातच प्राप्त होतात। ध्यानाची प्रगती झाल्यावर या अनेक दिव्य लोकांचे, लोकलोकांतरांचे साधकाला ध्यानात प्रत्यक्ष दर्शन होते।
मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥ त्याच्या सर्व कुळाचा, मातापिता सर्व कुलगोत्रांचा उध्दार होतो। त्या सर्वांना ऊतम गती प्राप्त होते।
सरुपता मुक्ती, ईश्वराच्या चतुर्भुज रुपाप्रमाणे होऊन विष्णुरुप होतो। एखाद्या कुळात हरिभक्त जन्माला आला की त्याचे बरोबर त्याच्या कुळातील सर्वांचाच ऊध्दार होतो। ईश्वरभक्तीचे असे महिमान आहे।
“मोदन्ते पितरो, नृत्यन्ति देवता: सनातना चेयं भूर्भवति॥७१॥ ॥नारद भक्तिसूत्र॥“ जेव्हा एखाद्या कुळात हरिभक्त जन्माला येतो तेव्हा स्वर्गातील, पितृलोकातील पितरांना आनंद होतो, आपल्या कुळात ईश्वरभक्त जन्माला आला आहे, अता तो आपला उध्दार करील असे पितरांना वाटते। कारण हरिभक्तीच्या प्रभावाने संपूर्ण कुळातील पितरांचा उध्दार होतो। आपुलिया हिता असे जो जागता।(जो होय जागता)।धन्य मातापिता तयाचिया॥१॥ कुळी कन्यापुत्र होती जीं सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा॥२॥ गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे॥३॥ तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥४॥ – जो आपल्या हिता विषयी जागा आहे त्याचे आईबाप धन्य आहेत॥१॥ कुळामध्ये जी कन्यापुत्र सात्विक होतात त्यांचा देवाला आनंद वाटतो॥२॥ जे निरंतर गीता भागवत श्रवण करितात आणि सर्वकाळ विठोबाचे चिंतन करितात॥३॥ तुकाराम महाराज म्हणतात, जर मला त्यांची सेवा घडेल तर माझ्या दैवाला पार नाही॥४॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥
हरिभक्तीत एवढे सामर्थ्य असते हे सामान्य लोकांना कळत नाही, त्यसाठीच, ते महत्व समजण्यासाठीच गुरुकृपा आवश्यक आहे। गुरुकृपेशिवाय हरिभक्ती चे नामस्मरणाचे महत्व कळत नाही। गुरुकृपेशिवाय हे गूढ ज्ञान प्राप्त होत नाही, कळत नाही। यामुळेच जानेश्वर महाराज म्हणतात, परमेश्वराच्या नामाचे महत्व, हे गूढ ज्ञान, मला श्रीगुरु निवृत्तीनाथांकडून त्यांच्या कृपेने मला प्राप्त झाले। [10-01-2023]
