
नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव जि. नाशिक येथील सुप्रसिद्ध कवयित्री सौ.प्रतिभा पवार-खैरनार यांच्या वंशावळीच्या प्राचीन सरीतून या कवितासंग्रहास पुणे येथील स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे हे ४० वे वर्षे आहे. दि.१२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिर पुणे येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मा. ना. सुनीलजी टिंगरे यांच्या शुभहस्ते आणि विजय ढेरे, दत्ता धनकवडे, सचिन जाधव, मोहन जोशी, संजय ढेरे, रामदास फुटाणे, गौरव फुटाणे, माधव गोगावले ( अमेरिका) भरत दौंडकर, अभिनेता महेश कोठारे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित झाले. सदरच्या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ११ हजार रुपये,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. प्रतिभा पवार-खैरनार यांच्या या कवितासंग्रहास यापूर्वी पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार व पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे मानाचे साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सदरच्या कवितासंग्रहाची अनेक वाड्मयीन जाणकारांनी प्रसंशा केली असून यासंदर्भात नियतकालिकातून समीक्षा लेखन प्रसिद्ध झाले आहे. हा कवितासंग्रह सध्या साहित्य वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. खैरनार यांचा हा तिसरा कवितासंग्रह असून एक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहे. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याने प्रतिभा पवार-खैरनार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
