
नाशिक- जिल्हा कोर्टासमोरील शासकीय अध्यापिका विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पांतर्गत अध्यापिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरण आणि प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी अध्यापिका विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेची बेडी सोडवणे, पाण्यावर दिवा पेटवणे, हवेत वस्तू तरंगवणे, हवेतून वस्तू काढणे, मंत्राने अग्नी पेटवणे ,अफवा मागील मानसशास्त्र, ताब्यातून पुन्हा पुन्हा तीर्थ काढणे, दृष्टीभ्रम,गडव्यात आभासी भूत गाडणे आदी चमत्कार सदृश्य प्रात्यक्षिके स्वतः सादर केली आणि त्यामागील शास्त्रीय कार्यकारणभाव स्पष्ट केला. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना असे चमत्कार सदृश्य प्रयोग सादर करून त्या मागील कार्यकारणभाव समजावून सांगता येईल, अशा प्रकारची तयारी प्रशिक्षण शिबिरातून करून घेण्यात आली.

शिबिरासाठी चौऱ्याहत्तर अध्यापिका उपस्थित होत्या.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनाने प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीराचा समारोप प्रा. जयश्री साळुंखे यांनी केला.
प्रशिक्षण शिबिरांमध्ये राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा .आशा लांडगे ,जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव,मोहन कादे यांनी मार्गदर्शन केले.
