
भोसरी (प्रतिनिधी ) आई सावित्रींच्या स्मृती प्रित्यर्थ महात्मा फुले शिक्षण संस्था, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ग्रामगीताचार्य सौ.मंजुषा संजय कऊटकर यांच्या कवितासंग्रह ‘मन जेव्हा हिरवळले’ याचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय मा. प्रा. अरुण पवार अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था तसेच प्रमुख अतिथी डॉ. मेघना वासनकर बगडे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक नागपूर महानगरपालिका उपस्थित होते.

मन जेव्हा हिरवळले’ या कवितासंग्रहास विख्यात हास्य कवी अशोक नायगावकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना तर विख्यात कवी, गीतकार मा.अशोक बागवे याची पाठराखण, व कविवर्य विठ्ठल वाघ याचे शब्दरूपी आशीर्वाद लाभलेले आहेत.
कविता ही संवेदनशील मनाची वेदना असते. स्त्री मनाचा हुंकार आणि अव्यक्त मौन हे भावविश्व या कवयित्रीने आपल्या काव्यसंग्रहातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदीर्घ काळानंतर हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह प्रकाशित होताना आनंद होत आहे अशा प्रकारची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रेम, निसर्ग, जीवन, देशप्रेम, अशा विविध विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांचा समावेश या काव्यसंग्रह मध्ये आहे. वाचकांनी या काव्यसंग्रहाचे जोरदार स्वागत करावे. अशी भावना कवयित्रीने व्यक्त केली आहे.
नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र या संस्थेच्या त्या कळमेश्वर तालुका विभाग प्रमुख आहेत. तसेच त्या उत्तम निवेदिका व संस्थेच्या अनेक महाकाव्यसंमेलनाच्या संयोजनाच्या मध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून सहभागी असतात. विविध वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन नेहमी प्रसिद्ध होत आले आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी नक्षत्र परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
