
लेखक : गजानन शिंदे
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. अत्यंत साध्या आणि कष्टाळू कुटुंबातून पुढे आलेल्या अक्षता शहाजी कदम यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवून विरशैव कक्कया ढोर समाजातील तसेच सातारा जिल्ह्यातील पहिली महिला लेफ्टनंट होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अक्षता कदम यांचे मूळ गाव मु.पो. चरेगाव, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा आहे. त्यांचा जन्म २००१ साली झाला. त्यांचे वडील शहाजी कदम हे फॅब्रिकेशन व लोखंड विक्रीचा व्यवसाय करतात, तर आई गृहिणी असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. काबाडकष्ट करून संसार उभा करणाऱ्या या कुटुंबातून अक्षता यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. त्यांचा भाऊ सध्या भारतीय सैन्यात प्रशिक्षण घेत आहे.
अक्षता यांचे शिक्षण अंगणवाडीपासून सुरू झाले. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण उंब्रज येथील होली कॉन्व्हेन्ट इंग्लिश मीडियम स्कूल येथे पूर्ण झाले. पुढे उत्कृष्ट गुणवत्तेमुळे त्यांना जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांनी नववी व दहावीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, खावली (सातारा) येथे पूर्ण केले.
यानंतर त्यांनी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून संजय घोडावत कॉलेज, अतिग्रे (कोल्हापूर) येथे शिक्षण घेतले. पुढे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.
अक्षता कदम यांच्या आयुष्यातील एक विशेष बाब म्हणजे त्यांनी अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवले. भारतीय सैन्याची परीक्षा देण्याच्या अगोदर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यातील तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांना नोकरीसाठी कॉलही आला होता; मात्र देशसेवेचे मोठे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही.
इतकेच नव्हे तर त्यांनी भारतीय वायुसेनेची परीक्षा देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. परंतु त्यांची खरी इच्छा आणि जिद्द भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा करण्याची होती. त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण लक्ष भारतीय सैन्यात प्रवेश मिळवण्यावर केंद्रित केले.
निवड झाल्यानंतर त्यांनी बिहारमधील गया येथे एक वर्षाचे कठोर लेफ्टनंट प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्वच स्तरांवर कसोटी लागणाऱ्या या प्रशिक्षणात त्यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता त्यांची देशाच्या सीमेवर पोस्टिंग झाली असून त्या तेथे देशसेवेचे कर्तव्य बजावणार आहेत. हिमालयातील कठीण वातावरणात देशाच्या सुरक्षेसाठी सेवा देणे ही मोठी जबाबदारी असून त्या ती जबाबदारी अभिमानाने पार पाडणार आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता जिद्द, मेहनत आणि देशसेवेची भावना यांच्या जोरावर अक्षता कदम यांनी हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सातारा जिल्ह्याचा मान उंचावला असून ग्रामीण भागातील अनेक मुलींना सैन्यात करिअर करण्यासाठी नवी प्रेरणा मिळत आहे.
✨ अक्षता कदम यांची ही यशोगाथा प्रत्येक तरुण आणि तरुणीला सांगते —
“स्वप्न मोठे असले, जिद्द प्रबळ असली आणि मेहनत प्रामाणिक असेल तर कोणतीही उंची गाठता येते.”
✍️ लेखक : गजानन शिंदे
