
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण होऊन समानतेची संधी प्रत्येक क्षेत्रात मिळायला हवी असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती डॉक्टर बी. बी. धोंगडे व श्रीमती एस ए लोखंडे मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात महिलांचे समाजातील योगदान, सध्याच्या काळात महिलांचे वाढते नेतृत्व आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. महिलांनी शिक्षण, विज्ञान, प्रशासन आणि विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
या प्रसंगी विद्यार्थिनींनी भाषण, व मनोगताद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. कार्यक्रमात उपस्थितांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सी. बी. निगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी वैष्णवी कवडे हिने मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. स्वप्निल शेंडगे यांनी केले. सदर कार्यक्रमास शंभरहून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक वृंद हजर होते
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांच्या सन्मान व सशक्तीकरणाबद्दल सकारात्मक जागरूकता निर्माण झाली.
