
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक।गुरु ओम्।गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-१६
हरि बुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी॥२॥ सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
बुध्दीच्या द्वारे हरिजप करणरा पुरुष दुर्लभ आहे। राम कृष्ण नाम घेणे वाणी ला खूप सोपे आहे। तरी त्याकडे सर्वांची प्रवृत्ती होत नाही। कारण ईश्वराचे नाम जिव्हेवर यायला सुध्दा पूर्वपुण्याई लागते। “बहुत सुकृतांची जोडी। म्हणुनि विठ्ठली आवडी॥१॥” अनेक जन्मांच्या संस्कारामुळे बहिर्मुख वृत्ती लवकर अंतर्मुख होत नाही। वृत्ती अंतर्मुख झाली कि नामस्मरणाची आवड आपोआप उत्पन्न होते।
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली रामकृष्ण नामस्मरणात साधक तल्लीन झाला कि त्याच्या मनाला उन्मनी अवस्था प्राप्त होते। प्रत्येकाला ४ देह असतात। स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकरण देह। प्रत्येक देहाला क्रमाने जागृती-स्वप्न-सुषुप्ती-तुर्यावस्था अशा ४ अवस्था आहेत। पहिल्या ३ अवस्थांचा अनुभव सामान्य मनुष्याला असतो। ४ थ्या तुर्यावस्थेचा अनुभव फक्त सिध्द महापुरुषांना असतो। तुर्यावस्थेत फक्त नित्यानंदच असतो। “जे तुर्येचे माजघर होय देखा।” असे ज्ञानेश्वर महाराजांनी या अवस्थेचे वर्णन केले आहे। निवृत्तीनाथ म्हणतात, “तुर्येमाजि माझा अखंड रहिवास। ” मी सतत तुर्यावस्थेतच राहातो। तुर्यावस्था म्हणजेच उन्मनी अवस्था, ही अत्यंत ऊच्च अवस्था असून जी योगीजनांना महत् प्रयासाने प्राप्त होते, ती ईश्वराच्या भक्तीत, नामजपात तल्लीन झाल्यावर भक्ताला सहज प्राप्त होते।
तयासी लाधली सकळ सिद्धी॥२॥ नामस्मरण करणार्याला सर्व सिध्दी ही प्राप्त होतात, पण भक्त त्यांच्याकडे पहात ही नाही। “सर्व सुखे येती माने लोटांगणी। कोण यासी आणि दृष्टीपुढे॥ आमुची आवडी संतसमागम। आणिक ते नाम विठोबाचे॥ तुकाराम महराज॥”
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥ एका हरिपाठात सर्व सिध्दी, बुध्दी धर्म या सर्वांचा समवेश होतो। धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत। शास्रोक्त विधीनुसार कर्मे करणे म्हणजे धर्म। महाभरतात “धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा। यत्स्यात् धारणसंयुक्तो स धर्म ” धारण करतो तो धर्म। जो प्रजेवे धारण करतो। आत्मधर्म स्वस्वरुपानुसंधान हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे। ४ पुरुषार्थांपैकी धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे। धर्मार्थकाममोक्षाणां मूलम् आरोग्यसाधनम्॥” धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे ४ पुरुषार्थ आहेत। हरिपाठात सर्व धर्मांचा समावेश आहे।
प्रपंचातील जीवांना ३ प्रकारचे ताप, त्रिविध ताप, अध्यात्मिक, अधिदैवीक, अधिभौतिक, दु:खे असतात, परंतु, संतसंगतीने व हरि चिंतनाने ते सर्व नष्ट होतात।
ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अखंड नामस्मरणाने माझ्या अंतर्मनावर रामकॄष्ण रुपी ठसा उमटला आहे।त्यामुळे दाही दिशांना मला परमेश्वरच दिसत आहे। [ 09-01-2023]
