
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम)
मोजे आंदेगाव (पश्चिम) ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील युवक-नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला ग्रामविकास अधिकारी श्री. जी.डी. शिंदे, सरपंच प्रतिनिधी श्री. धम्मपाल वाढवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शेख फरीद शेख खुनशा, माजी सैनिक सुभेदार श्री. चिमणाजी राजाराम थोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, शाळेच्या मूलभूत सोयी-सुविधा वाढविणे तसेच शाळेचा परिसर निसर्गरम्य करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेत रंगरंगोटी, फर्निचर, बांधकाम दुरुस्ती, कंपाउंड वॉल, संगणक-प्रिंटर, ग्रीन बोर्ड, कपाट, सोलार प्लांट आदी भौतिक गरजांवर भर देण्यात आला. तसेच शाळेला आकर्षक मुख्य गेट व कमान उभारणे, ध्वजारोहणासाठी मध्यभागी ध्वजस्तंभ उभारणे, विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम उभारणे यावरही चर्चा झाली. जिल्हा क्रीडा विभाग व जिल्हा परिषद नांदेड यांच्या माध्यमातून खेळाचे साहित्य व विद्यार्थ्यांसाठी बाकांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी श्री. जी.डी. शिंदे यांनी शासनाच्या आदेशानुसार शाळेत सोलार प्लांट बसविण्याबाबत सकारात्मक माहिती दिली. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून काही कामे पूर्ण करून उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत मुजळगे व सहशिक्षक श्री. राम जाधव यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. ऑक्टोबर २०२५ मध्ये शाळेत दोन तरुण व उच्चशिक्षित शिक्षकांची नियुक्ती झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सभेत सरपंच सौ. कांताबाई विठ्ठल वाढवे, श्री. साईनाथ पालजवाड, श्री. रामराव बक्केवाड, श्री. गंगाधर नरवाडे, श्री. धम्मपाल वाढवे, श्री. रामदास पोलसवाड, श्री. आकाश कटकमवाड, श्री. नारायण अनमवाड, श्री. पवन नलावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले.
सन २००१ मध्ये सुरू झालेल्या वस्ती शाळेचे आज जिल्हा परिषद शाळेत रूपांतर झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी जि.प. शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना आंदेगाव (प.) येथील ग्रामस्थांचे शाळेबद्दलचे प्रेम, ग्रामपंचायतीचा पाठिंबा आणि मुख्याध्यापकांची तळमळ पाहता ही शाळा आदर्श व नावलौकिक प्राप्त करणारी ठरेल, असा आशावाद सभेत व्यक्त करण्यात आला.
