
मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांना विनम्र अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक
नांदगाव :– मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात नुकताच शिक्षण महर्षी कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा पुण्यतिथी कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी उपशिक्षिका मंगिता परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कर्मवीरांच्या जीवनातील संघर्षाचे आणि त्यांनी सामान्य जनतेसाठी उभे केलेल्या शैक्षणिक कार्याचे दाखले देत, त्यांच्या विचारांची आजच्या काळात किती गरज आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. “शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हा विचार कर्मवीरांनी आयुष्यभर जपला. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सामाजिक भान जोपासावे आणि जिद्दीने आपले ध्येय गाठावे,” असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मवीरांच्या स्मृतींना अभिवादन करून आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
