

नांदगाव:– मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात नुकतीच ‘कर्मवीर बाबुराव ठाकरे’ आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ‘यशवंतराव चव्हाण’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही महान नेत्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही मान्यवरांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक निलेश वाळके यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले. “शिक्षणाची गंगा तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मवीरांनी केलेले कष्ट आणि त्यांचा शैक्षणिक वारसा आजही प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती काळे होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर बाबुराव ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. काळे म्हणाल्या की, “एकीकडे कर्मवीरांनी शिक्षणाची दारे खुली केली, तर दुसरीकडे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
