
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग १५॥
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुध्दी घेतां समान श्रीहरि । शमदमांवेरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥
एका हरिनामावर दृढ विश्वास ठेवल्यावर दुसरे नावे घेण्याची किंवा दुसर्या देवतांची पुजा करण्याची गरज नाही। अनेक देवतांची पुजा करणारा अज्ञानी भक्त कसा असतो याचे ज्ञानेश्वरीतील व्यभिचारी भक्त ह्या विषयाचे विवेचन आपण यापूर्वी ऐकले आहे। सर्वत्र एकाच ईश्वराला पहाणे, त्याचेवरच एकनिष्ठ प्रेम करणे हे एक अद्वैतकुसरी व्यक्तीच जाणतो। सर्वत्र एकाच देवाला पहाणे, एकाच देवाची भक्ती करणे, एको देव एक धर्म, एकनिष्ठा (गुरुगीता) हे किती दुर्लभ आहे या विषयी भगवद्गीतेत भगवान सांगतात, “बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ:॥७-१९॥ अनेक जन्मांच्या (तपश्चर्येनंतर, साधने नंतर) ज्ञानी पुरुष मला येऊन मिळतो। सर्वत्र, सर्वच वासुदेव आहे (सर्वं खल्विदं ब्रम्ह) अशी ज्याची अनुभूति आहे, सर्वत्र एकाच ईश्वराला पाहाणारा, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे। “जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोग निश्चित जाण माझा॥ ज्ञानेश्वरी॥“ बाबा मुक्तानंदांची शिकवण आहे, “परस्पर देवो भव” एकमेकात देवाला पहा। ” मुक्तानंद बाबा सर्वांना नमस्कार करतात। ते म्हणतात “आपका सभीका प्रेमपूर्वक हार्दिक स्वागत।” ते म्हणतात, मी तुम्हाला नमस्कार करीत नाही, तुमच्या आत जो एकच परमात्मा आहे, त्याला मी वंदन करतो। परस्परात, एकमेकात, सर्वांमध्ये ईश्वराला पहाणे ही संतांची शिकवण आहे।
समबुध्दी घेतां समान श्रीहरि । शमदमांवेरी हरि झाला ॥२॥ समबुध्दीचा विचार, स्विकार केला तर श्रीहरी समान आहे। बुध्दीतील विषमता नष्ट होऊन समत्व यावे यासाठी शमदमादि साधने आहेत। मनोनिग्रह, इंद्रियदमन, शम-दम। यांनी बुध्दी सम, स्थिर झाली की हरी सर्वत्र दिसायला लागतो।
सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ घट म्हणजे देह, सर्व घटात, सर्व देहात एकच हरि, आत्मा आहे। देह जरि अनेक आहेत तरी आत्मा एकच आहे। जसे प्रकाशकिरणे असंख्य आहेत पण सूर्य एकच आहे, त्याप्रमाणे। भगवद्गीतेत क्षेत्र-क्षेत्रज्ञ असा एक अध्याय आहे। त्यात भगवान श्रीकृष्ण सांगतात, ” इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते। एतद्यो वेत्ति तं प्राहु:क्षेत्रज्ञमिति तद्विद:॥१३-१॥” हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे, आणि जो या क्षेत्राला शरीराला जाणतो त्याला “क्षेत्रज्ञ” असे नाव आहे। शरीरातील आत्मा। जसे शेतात जे पेरावे ते उगवते, त्याप्रमाणे या देहाने जे कर्म करावे तसे फळ प्राप्त होते। “क्षेत्रज्ञं चापि मां विध्दि सर्व क्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम॥१३-२॥ सर्व ज्ञेत्रांचे ठिकाणी जो व्याप्त आहे तो सर्व क्षेत्रांना जाणणारा क्षेत्रज्ञ, म्हणजे परमात्मा, परमेश्वर आहे। ईश्वर स्वयंप्रकाशी असून सर्व विश्वाला प्रकाश देणारा आहे। गीतेत सांगितले आहे, सूर्य चंद्राचे तेज, अग्निचे तेज हे सर्व, तेज प्रकाश ईश्वराचेच आहे।
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते। ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम्।। १३-१७।। न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारका: नेमा विद्युतो कुतोऽयमग्नि:। तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति॥ उपनिषद्॥ त्या ईश्वराला सूर्य, चंद्र तारे वीज अग्नी हे प्रकाशीत करु शकत नाही करण या सर्वांना ईश्वरापासूनच प्रकाश प्राप्त होतो।
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥ या एकमेव हरीला मी हृदयात धारण केले, त्यामुळे मी मागील जन्मातच मुक्त झालो। संत मुक्त झाल्यावर, पुर्ण झाल्यावर फक्त परोपकारा करीताच दुसर्यांना ईश्वरप्राप्ती करुन देण्यासाठीच अवतार घेतात। “तुका म्हणे आता। उरलो परोपकारापुरता॥”
हरिपाठ विवरण वाचतांना आपल्या लक्षात एक गोष्ट आली असेल की, हरिपाठात काही विषय तेच तेच पुन्हा पुन्हा सांगीतले जातात। उदाहरणार्थ- नाम जप, हरिनाम, अद्वैत, द्वैत, सर्वत्र ईश्वराला पहाणे, संत, सद्गुरु, इत्यादि। एकच विषय पुन्हा पुन्हा सांगणे हा एक दोष आहे, याला “पुनरुक्तीदोष” असे नाव आहे। हरिपाठात हा दोष आहे। हरिपाठातच काय, परंतु, अनेक संत ग्रंथात हा दोष असतो। संतांनी हा दोष ग्रंथात मुद्दामहून केलेला असतो। एक विषय एकदा सांगून समजत नाही, त्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावे लागते, जेणेकरुन तो अंत:करणात पूर्ण बिंबला पाहिजे। पूर्ण समजला पाहिजे, कृतीत आणला गेला पाहिजे। एखादा खिळा हतोड्याने भींतीत ठोकताना एकच ठोकण्याची क्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते, तरच तो खिळा पूर्णपणे भींतीत जातो, क्रिया जरि एक असली तरी परिणाम प्रत्येक वेळी वेगळा असतो, त्यात प्रगती असते।। तसेच ब्रम्हज्ञान पुन्हा पुन्हा सांगावे लागते, तेव्हाच त्याचा परिणाम होतो। लक्षात आले नाही तरी रोज प्रगती होत रहाते। ध्यानाचे, साधनेचे सुध्दा असेच आहे। एकच क्रिया सातत्याने रोज, नियमितपणे, पुहा पुन्हा करावी लागते, तेव्हाच एक दिवशी पूर्ण आत्मसाक्षात्कार होतो। [08-01-2023]
