
हिमायतनगर (प्रतिनिधी) शेख मुजम्मील
मोजे आंदेगाव (पूर्व) ता. हिमायतनगर येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर हिमायतनगर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदेगाव (पूर्व) परिसरात काही व्यक्तींकडून अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक व बीट जमादार श्री गेडाम यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान तीन अवैध देशी दारू विक्रेत्यांना मुद्देमालासह पकडण्यात आले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे आणण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (ई), 83 व 116 अन्वये अवैध देशी दारूची विक्री व साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे आंदेगाव परिसरात अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे.
